मनाई आदेशाचा भंग करून खा. विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्याच्या आरोपातून माजी सभापतींसह संशयीत निर्दोष !
संशयितांच्या वतीने ॲड. स्वरूप नारायण पई यांचा युक्तिवाद
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग करून खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्या च्या आरोपातून माजी सभापती अजिंक्य पाताडे व अन्य संशयितांची मालवण न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी युक्तिवाद केला.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी मनाई आदेश जारी केलेला असताना १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सुकळवाड येथे शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी मालवण पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजिंक्य कृष्णा पाताडे, चेतन प्रमोद मुसळे, विशाल प्रमोद मुसळे, जगदीश सुभाष चव्हाण, समीर सत्तार शेख, स्वप्नील गजानन गावडे यांच्या विरूध्द मालवण पोलीस ठाण्यामध्ये १३ फेब्रुवारी २०२१ रोजी भा.दं.वि. कलम १४३, १४९, व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (ब) (ड) (ई), ३७ (३) अ, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी संशयित आरोपीविरूध्द तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते.
याकामी सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी बाजू मांडली. आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व तपासकामातील त्रुटी विचारात घेवून मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब तथा सह दिवाणी न्यायाधीश यांनी संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.