मालवण शहराला शासनाकडून कोट्यावधीचा निधी ; गरज फक्त कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांची !
महेश कांदळगावकर यांची प्रतिक्रिया ; विद्यमान मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा डागली तोफ
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील विविध विकास कामांच्या दुर्लक्षावरून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडलं आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला कारंजा गेले सहा महिने बंद असून वारंवार सूचना करूनही त्याची दुरुस्ती केलेली नाही. तसेच कोळंब पुलानजीक आणि आडारी गणपती मंदिर सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. अन्य नगरपालिकांचे मुख्याधिकारी शहर सौंदर्याचे पुरस्कार घेत असताना आमचे मुख्याधिकारी सुशागात आहेत. मालवण शहराला आज शासनाकडून कोट्यावधीचा निधी प्राप्त होत आहे. मात्र गरज आहे फक्त कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांची, अशी प्रतिक्रिया श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
याबाबत श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मालवण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फोवकांडा पिंपळ येथील गार्डन मधील रंगीत कारंजा गेले सहा महिने बंद अवस्थेत आहे. याबाबत मुख्यअधिकारी याना वारंवार आठवण करून सुध्दा याची दुरुस्ती झालेली नाही. एका बाजूने शहरसौंदर्यासाठी सिंधुदुर्गातील नगरपालिका राज्य पुरस्कार घेत आहेत. त्याच सिंधुदुर्गात मालवण मुख्याधिकारी यांच्या हलगर्जीपणामूळे शहराचे सौंदर्य बिघडण्याचं काम होत आहे. मालवणच्या मध्यवर्ती ठिकाणी या गार्डनचे आमच्या कालावधीमध्ये सुशोभिकरण करून यामध्ये रंगीत कारंजा बसविण्यात आला आहे. त्यामूळे पर्यटनदृष्ट्या मालवण शहराच्या सौदर्यात भर पडली आहे. अश्या या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या गार्डनची आज दयनीय अवस्था झाली आहे. कारंजा बंद, आतमधील गार्डनच्या डेकोरेटिव्ह लाईट बंद, कचऱ्याची झाडलोट केली जात नाही, आणि केली तर महिनोंमहिने कचरा उचलला जात नाही. झाडांना नियमित पाणी लावले जात नाही. सध्या फोवकांडा पिंपळ येथील रिक्षा मंडळ या ठिकाणी झाडांना पाणी लावत आहेत. त्यामुळे तरी या गार्डनच थोडं फार अस्तित्व टिकवून आहे. पर्यटकांना आकर्षणाबरोबरच मालवणच्या नागरिकांना एक विरंगुळा ठिकाण म्हणून असणारे हे गार्डन आज ओस पडल्यासारखे आहे.
शहराच्या प्रवेशद्वाराजवळील परिसर आकर्षक दिसावा यासाठी कोळंब खाडीच्या बाजूने पेव्हर ब्लॉक, स्टील रेलीग, बसण्यासाठी कट्टे व आकर्षक डेकोरेटिव्ह लाईट आमच्या कालावधीत बसविण्यात आल्या आहेत. पण या बसविल्यापासून आजमिती पर्यत याठिकाणी पेव्हर ब्लॉकची, स्टील रेलिंगची , बसण्याच्या कट्ट्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही.
आडारी गणपती मंदिर कडील सुशोभिकरणाची स्वच्छते अभावी हीच स्थिती आहे. या ठिकाणी स्टील रेलिंगला लावलेल्या काचा साफ करणे बाबत वारंवार कळवूनही सहा महिने यावर कुठलीही कार्यवाही न केल्याने शेवटी स्वखर्चाने हे काम करण्याची पाळी आमच्यावर आली. येथे डेकोरेटिव्ह लाइट बसविण्यात आल्या. त्यांच्या कव्हर अद्यापपर्यत बसविण्यात आलेल्या नाहीत. नुसते सुशोभीकरण करून चालत नाही तर त्याची दुरुस्ती आणि देखभाल पण तेवढीच गरजेची आहे.
मुख्य अधिकारी सकारात्मक काम करणारा , शिस्तप्रिय आणि त्या शहराच्या विकासाचा ध्यास असणारा मिळाला पाहिजे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे कमी जास्त प्रमाणात आपल्या शहराची विकास कामे, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत असतात. मग त्यात त्यांचा राजकीय हेतू असो किंवा समाजसेवेची मुळात असलेली आवड असो. पण यासाठी प्रशासकीय साथ महत्वाची असते. यासाठी प्रशासन प्रमुख म्हणून असणाऱ्या मुख्यअधिकारी यांच्या कार्यपद्धतीवरच शहराचा विकास अवलंबून असतो. मात्र बऱ्याच मुख्याधिकारी याना शहराच्या विकासाचं काहीही देणंघेणं नसतं. हे फक्त आपला नगरपालिकेतील तीन वर्षाचा कालावधी कसाबसा संपविण्याच्या मानसिकतेत असतात. मालवण नगरपरिषदेला यापूर्वी लाभलेले सुधीर राऊत, किरणराज यादव यासारखे हाताच्या बोटावर मोजण्या इतके मुख्य अधिकारी असतात, ज्यांना स्वतःहून न. प. च्या विकास कामाबद्दल आस्था असते, कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असते, कर्मचारी याच्यावर कामाचा वचक असतो. सध्या शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मालवण न. प. ला प्राप्त होत आहे. फक्त गरज आहे ती राऊत साहेब, यादव साहेबांसारख्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांची, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.