गाबीत महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत भूषण मेतर यांची रांगोळी प्रथम
लतिका शिर्सेकर यांच्या रांगोळीस द्वितीय तर विनोद परब यांच्या रांगोळीस तृतीय क्रमांक
मालवण : मालवण येथे आयोजित गाबीत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत मालवण मेढा येथील भूषण राजन मेतर यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. त्यांनी काढलेली शेंडी पागणे ही पारंपारिक मच्छिमारी पद्धतीवरील रांगोळी सर्वोत्कृष्ट ठरली.
या स्पर्धेसाठी गाबीत संस्कृती, गाबीत लोककला, मत्स्यशेती, समुद्र संपत्ती, पर्यटन, सामाजिक संदेश देणारी रांगोळी असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत गाबीत समाजातील महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग घेत विविध सुबक रांगोळ्या साकारल्या. यात भूषण मेतर यांनी काढलेल्या रांगोळीला प्रथम क्रमांक देण्यात आला. तर लतिका शिर्सेकर (धुरीवाडा मालवण) हिने काढलेल्या रांगोळीस द्वितीय आणि विनोद परब (दांडी) यांच्या रांगोळीस तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच राजा खवणेकर यांच्या रांगोळीस उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण मूर्तिकार व रांगोळीकर पवनकुमार पराडकर, सौ. श्रुती बांदेकर यांनी केले. तर स्पर्धेसाठी सौ. माधुरी प्रभू यांचे सहाय्य लाभले.
सर्व विजेत्या स्पर्धकांना दांडी येथे गाबीत महोत्सव कार्यक्रमात रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर प्रथम क्रमांक विजेत्या भूषण मेतर यांना नरेश कालमेथर व सौ. दीपाली कालमेथर यांच्याकडून शंख शिंपल्या पासून बनवलेली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, संघटक रविकिरण तोरसकर, बाबा मोंडकर, अशोक तोडणकर, पूजा सरकारे, श्री. बांदकर, अन्वय प्रभू, छोटू सावजी, रुपेश खोबरेकर, सुरवी लोणे, माधुरी प्रभू आदी व इतर उपस्थित होते.