“एमआयटीएम” इंजिनियरिंग कॉलेजचे कार्य उल्लेखनीय ; पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे गौरवोद्गार
महाविद्यालयाचा आठवा पदवीदान समारंभ संपन्न ; १२३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
मालवण | कुणाल मांजरेकर
जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मँनेजमेंट सुकळवाड या सिंधुदुर्गातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक पदवीदान सोहळा नुकताच पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या समारंभामध्ये १२३ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी प्रदान करण्यात आली. पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा गौरव केला. संस्थेने एवढ्या प्रशस्त जागेत कॉलेजचा भलामोठा डोलारा उभा केला आहे. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांची मेहनत उल्लेखनीय असल्याचे सांगून कॉलेजच्या भविष्यातील वाटचालीला त्यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले.
प्रारंभी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे उद्योजक रविराज कुलाल, मेरीटाईम बोर्डऑफिसर संदीप भुजबळ, संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. पी. ए. हुबळी, डिग्री प्राचार्य डॉ. एस. एल.भोळे, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य एस. सी. नवले, अकॅडमिक डीन प्रा. पूनम कदम, एक्झाम डीन प्रा. विशाल कुशे, एडमिन ऑफिसर राकेश पाल, प्रा. तुषार मालपेकर, प्रा. मनोज खाडिलकर, प्रा. संजय कुरसे, प्रा. मयुरी दिवाण, प्रा. काजल सुतार आदी उपस्थित होते. यावेळी पद्मश्री गंगावणे यांनी कॉलेजमधील यशस्वी विद्यार्थ्यांना अगदी मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले. शिकण्याचे सातत्य सोडू नका. पैसा आपल्याकडे आपोआप येईल. तुम्ही फक्त आयुष्यात चांगले काम करा, असे ते म्हणाले.
यावेळी डिप्लोमाचे प्राचार्य एस. सी.नवले यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत इंजिनिअरिंग क्षेत्र किती महत्वाचे आहे, हे पटवून दिले. ते म्हणाले आयुष्य हे आव्हानात्मक आहे. आपला वेगळेपणा तुम्ही समाजात दाखवा. स्वतःला व्यस्त ठेवा. सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करा. यातून तुम्ही तुमचे वेगळेपण दाखवा. तर डिग्रीचे प्राचार्य एस. एल.भोळे म्हणाले की, चांगले गुण मिळवून सगळेच यशस्वी झालेत. पण तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. पी. ए. हुबळी यांनी निसर्ग हाच आपला खरा शिक्षक आहे. त्याला ओळखा आयुष्यातील पहिले यश म्हणजे पदवी असल्याचे सांगून या यशाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मेरीटाईम बोर्ड अधिकारी संदीप भुजबळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कोणतेही काम हे कमी असू शकत नाही. यासाठी काही तरी अचूक काम निवडले तर तुम्ही यशस्वी होवू शकता, असे ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाल यांनी सर्वप्रथम यशस्वी विद्यार्थ्यांनाचे अभिनंदन केले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कॉलेजचे प्राचार्य यांचे कौतुक केले. ते म्हणाले, कोविड काळ हा भयंकर मोठा संकटाचा काळ होता. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्याचे फळ आज मिळाले आहे. ग्रामीण भागात असलेल्या आणि कोणतीही फारशी प्रवास सुविधा नसलेल्या ठिकाणी एक कॉलेज गेली दहा वर्षे उभं राहतं आणि त्या कॉलेजचे विद्यार्थी नॅशनल लेव्हलपर्यत पोहचतात, मोठी बाब आहे. असे सांगून त्यांनी कॉलेजचा विद्यार्थी अभिषेक सिंगचे विशेष कौतुक केले. त्याने सायबर क्राईमवर लिहिलेल्या पुस्तकाचे राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपालां कडून त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. ही आपल्या कॉलेजसाठी अभिमानास्पद बाब आहे. आज आपले विद्यार्थी जगभर यशस्वी झालेले आहेत, असे ते म्हणाले. या कार्यक्रमास कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आफरिन शेख आणि प्रा. ऑश्ले फर्नांडिस यांनी केले तर प्रा. विशाल कुशे यांनी आभार मानले.