कोळंबमध्ये तणाव ; “त्या” डंपर मालकाच्या उद्धट उत्तराने संतप्त ग्रामस्थांनी डंपर अडवले !

डंपरच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी ओझर ते कोळंब मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

आचरा मालवण मार्गावरून भरधाव वेगाने येणारा वाळूचा डंपर कोळंब येथे दगडी कुंपण तोडून घराच्या अंगणात घुसल्यानंतर येथील वातावरण तणावमय बनले आहे. संबंधित डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ सुरु केल्याने गुरुवारी सकाळपासून ग्रामस्थांनी कोळंब मार्गावरील डंपर अडवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. भरधाव डंपरचा वेग कमी करण्यासाठी जोपर्यंत ओझर ते कोळंब रस्त्यावर गतिरोधक होत नाही, तोपर्यंत या मार्गावरून डंपर वाहतूक होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आचरा ते मालवण मार्गावरून भरधाव वेगाने वाळूची वाहतूक करणारे डंपर स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. आचऱ्याकडून मालवणच्या दिशेने येणाऱ्या डंपरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा डंपर ( एम एच ०७ – सी – ६१३१) दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोळंब येथे घडली होती. याठिकाणी दररोज मुले खेळत असतात. सुदैवानेच आज येथे कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक बनले होते. या डंपरचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला. या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याठिकाणी भरधाव डंपरमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे येथून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा वेग कमी न झाल्यास कोळंब मार्गावरून डंपर वाहतूक बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. गुरुवारी सकाळ पासून येथून वाळू नेणारे डंपर अडवण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली. यावेळी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, संदीप शेलटकर, पद्मा गवाणकर, आबा भोजने, शरद लोके, भास्कर कवटकर, सुनील फाटक, सिया धुरी, सचिन कांडरकर, हेमंत कामतेकर, आबु नेरकर, अवि नेरकर, पंकज कवटकर, हर्ष बांदेकर, रूपेश आंगणे, श्रीधर परूलेकर, मयुरेश मेस्री, प्रसाद कामतेकर, बापू बावकर, साहिल पराडकर, चिन्मय पराडकर, महेश शेलटकर, रोहित हडकर, शशांक धुरी, प्रमोद कांडरकर राजू सालकर, राजेंद्र प्रभुगावकर, यश बांदेकर, महेश कांदळगावकर, महेश सातार्डेकर, संतोष धुरी, किशोर कांदळगावकर, सुशांत भोजने यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. याठिकाणी आठ ते दहा डंपर अडवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु होता. सदरील डंपर चालकाने ग्रामस्थांची माफी मागावी आणी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!