डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उपोषणास आ. वैभव नाईक यांचा पाठींबा
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या घेतल्या जाणून
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. सलग चार दिवस हे उपोषण सुरू असून गुरुवारी आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आपल्या सोबत असल्याचे सांगत आ. वैभव नाईक यांनी उपोषणाला पाठींबा दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ११२७ एवढी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तर आंतरजिल्हा बदलीने आणखी काही पदे रिक्त होणार आहेत. असे असताना शासनाकडून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे डीएड पदवी घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळालेली नाही. डीएड पदविका अन्य कोणत्याही नोकरीसाठी उपयोगी येत नाही. त्यामुळे डीएड बेरोजगार उमेदवारांसमोर नोकरीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील डीएड बेरोजगार एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा चौथा दिवस तरी देखील शासनाने अद्याप पर्यत कोणतीही दखल घेतली नाही अशी व्यथा उपोषण कर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मांडली.