कोळंबमध्ये भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून थेट अंगणात ; सुदैवानेच जीवितहानी टळली ….

अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक ; चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप

तहसीलदारांच्या कार्यपद्धती विरोधात ग्रामस्थांकडून संताप ; “त्यांना” फक्त वाळूचे डंपर पकडण्यातच “इंटरेस्ट” !

डंपरचा वेग कमी न झाल्यास कोळंब मार्गावरून डंपर वाहतूक बंद करण्याचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

आचरा ते मालवण मार्गावरून भरधाव वेगाने वाळूची वाहतूक करणारे डंपर स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. आचऱ्याकडून मालवणच्या दिशेने येणाऱ्या डंपरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा डंपर ( एम एच ०७ – सी – ६१३१) दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोळंब येथे घडली. याठिकाणी दररोज मुले खेळत असतात. सुदैवानेच आज येथे कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक बनले होते. या डंपरचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. अपघातानंतर तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांनी अपघातानंतर दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. याठिकाणी भरधाव डंपरमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे येथून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा वेग कमी न झाल्यास कोळंब मार्गावरून डंपर वाहतूक बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

आचरा ते मालवण रस्त्यावर प्रवास करणारा डंपर (एमएच ०७ सी ६१३१) बुधवारी सायंकाळी दगडी कुंपण तोडून राजन आंगणे यांच्या अंगणात घुसला. मोठा आवाज होताच घरातील सदस्य व शेजारील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. अपघाताची तीव्रता बघून सगळेच हादरून गेले. अपघातास कारणीभूत डंपर चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप करून ग्रामस्थ आक्रमक बनले होते. जे दगडी कुंपण तोडून डंपर घुसला त्या ठिकाणी मुले खेळतात एकत्र बसतात. नेमकी आजच त्या ठिकाणी मुले नव्हती. तसेच दगडी कुंपण नसते तर डंपर थेट घरातच घुसला असता. मोठा अपघात घडला असता अशी भिती व्यक्त करण्यात आली. अपघाताची माहिती देऊनही पोलीस वेळेत न पोहोचल्याचे सांगत ग्रामस्थ अधिक संतप्त बनले. अखेर पोलीस दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थ यांनी आपला संताप व्यक्त करत या मार्गावरून अशी धोकादायक डंपर वाहतूक बंद करा. अशी मागणी लावून धरली. तर नशेत असलेल्या डंपर चालक यांची वैद्यकीय तपासणी तात्काळ करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. रात्री उशिरा पर्यंत वातावरण तंग बनले होते.

तहसीलदारांना वाळूचे डंपर पकडण्यातच “इंटरेस्ट” !

या अपघातानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या कार्यपद्धती बाबत ग्रामस्थानी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. डंपर अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार येथे दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे भरधाव डंपरचा प्रश्न मांडून तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी केली. मात्र तहसीलदारांनी हा विषय आपल्या अख्त्यारीत येत नसून अपघाता बाबत पोलीस आणि आरटीओला कळवा, असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांचे काहीही न ऐकता तहसीलदार येथून निघून गेल्याचे सांगत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांना वाळूचे डंपर पकडण्यात अधिक रस आहे, पण ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेण्यास वेळ नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याठिकाणी भरधाव डंपरमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे येथून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा वेग कमी न झाल्यास कोळंब मार्गावरून डंपर वाहतूक बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!