तोंडवळी सरपंचांच्या पतीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

कोळंब येथील घटना ; पंचक्रोशीत खळबळ, पोलीस तपास सुरु

मालवण | कुणाल मांजरेकर

तालुक्यातील तोंडवळी वरची येथील निलेश गोविंद तोंडवळकर (वय ४२) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओझर येथे आंब्याच्या झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. निलेश तोंडवळकर हे तोंडवळीच्या सरपंच नेहा तोंडवळकर यांचे पती होते. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येत असले तरी आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे तोंडवळी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यालगत असणाऱ्या आंब्याच्या झाडाला एका तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत स्थानिकांना तसेच अन्य दुचाकीस्वारांना दिसला. हा मृतदेह निलेश तोंडवळकर यांचा असल्याचे समजताच त्यांचा भाऊ गणेश तोंडवळकर ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, हेमंत पेडणेकर, सुभाष शिवगण, सुशांत पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. निलेश तोंडवळकर हे आज सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते स्थानिकांना ओझर येथून दुचाकीवरून जाताना दिसले. ओझर हायस्कूलच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली दुचाकी लावलेली दिसून आली. १० वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना, स्थानिक ग्रामस्थांना आंब्याच्या झाडास त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!