“या” अटीवर वैभव नाईक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास होते तयार…..
भाजपा नेते निलेश राणेंचा दावा ; आरोप खोटा असेल तर कोणत्याही देवाला हात लावून नकार देण्याचं आव्हान
वैभव नाईक यांनी आजवर उद्धव ठाकरेंशी खोटं बोलून जिल्ह्यातील शिवसेनेची मलई खाल्ल्याचीही टीका
मालवण | कुणाल मांजरेकर
आमच्या पक्षात आला नाही तर जेलमध्ये टाकीन, अशी धमकी बड्या नेत्याकडून आपल्याला मिळाली होती, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. यावरून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आ. नाईक यांचा समाचार घेतला आहे. वैभव नाईक कितीवेळा आणि कसे कसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, पक्षात येण्याचे सांगून आपली किती कामे करून घेतली हे सर्वांना माहित आहे. राणेना विचारा कुडाळ मालवण मधून लढाणार की नाही. आणि मला कुडाळ मालवण मधून उमेदवारीची खात्री द्या, मी १०० % शिवसेनेत येतो, असं वैभव नाईक यांनी शिंदे साहेबांना म्हटलं होतं. वैभव नाईक याला उद्धव ठाकरे यांच्याशी काही देणंघेणं नाही. त्याला फक्त स्वतःची आमदारकी हवी आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. माझा आरोप खोटा असेल तर वैभव नाईक याने सांगेल त्या मंदिरात देवाला हात लावून सांगावं, असं आव्हान देखील निलेश राणे यांनी दिले आहे.
भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर वरून व्हिडीओ पोस्ट करीत वैभव नाईक यांचा समाचार घेतला आहे. वैभव नाईक सातत्याने मी उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत आहे, त्यांची साथ कधी सोडणार नाही. अशा बोगस वार्ता करीत आहेत. खर तर निष्ठेचा आणि वैभव नाईक यांचा दूर दूर हूनही संबंध नाही. वैभव नाईक यांच्या घरची लोकं देखील त्याच्या निष्ठेचा दाखला देणार नाहीत. हा कोणाशी तरी निष्ठावंत आहे हे त्यांना पण माहित नाही. असं असताना सातत्याने त्याचं मी पक्ष सोडणार नाही, असं स्टेटमेंट देण सुरु आहे.
कितीवेळा तु शिंदे साहेबांकडे जाऊन भेटलास, कितीवेळा आपली कामे करून घेतलीस, कधी कधी कुठे कुठे भेटलास हे अनेकांना माहित आहे. म्हणून निष्ठेच्या वार्ता वैभव नाईक याने करू नयेत. मागच्या काळात जेव्हा वैभव नाईकला समोरून विचारलं की शिवसेनेत येतोस का ? त्यावेळी त्याने सांगितलं राणेना विचारा कुडाळ मालवण मधून निवडणूक लढवणार का ? आणी मला तिकिट मिळण्याची खात्री दया. मी १०० % तुमच्या बरोबर येतो. हे बोलला की नाही, वैभव नाईक याने ज्या मंदिरात सांगेल, त्या देवावर हात ठेवून सांगावं, ही चर्चा झाली की नाही ? उद्धव ठाकरे तेल लावत गेले मी आमदार असलो पाहिजे. ह्या गणितात वैभव नाईक आहे. त्याला उद्धव ठाकरे यांचं काही देणंघेणं नाही. उद्धव ठाकरे काय करतात, कुठला पक्ष चालवतात ह्याचं देणेघेण नाही. आम्ही काँग्रेस मध्ये गेलो म्हणून वैभव नाईक शिवसेनेत आहे. याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. असे निष्ठावान कधीपासून झाले काही कळालं नाही. वैभव नाईक हा एक नंबर खोटारडा आहे. उद्धव ठाकरे यांना खोटं बोलून त्याने आजवर शिवसेनेची सगळी मलई खाल्ली, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.