मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह ; शेकडो नागरिकांचा सहभाग …
गोव्याच्या रोंबाटासह स्वराज्य महिला पथकाच्या महिला रोंबाटाने जिंकली मने ; बच्चे कंपनीच्या वेशभूषांनी आकर्षण
आ. वैभव नाईक, भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
गुढीपाडव्याच्या सणाचे आकर्षण असणारी मालवण मधील प्रसिद्ध हिंदू नववर्ष स्वागत यात्रा बुधवारी सायंकाळी उशिरा संपन्न झाली. रूढी, परंपरा, संस्कृती याची जोपासना करण्यात प्रसिद्ध असलेल्या मालवणवासीयांनी शहरातून उत्साहपूर्ण आणि जल्लोशी वातावरणात रॅली काढून हिंदू नव वर्षाचे स्वागत केले. बार्देश गोवा येथील पारंपरिक रोंबाट नृत्य यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेचे आकर्षण ठरले. त्याचप्रमाणे स्वराज्य ढोल पथक आणि महिला ग्रुपच्या वतीने स्थानिक महिलांनी सादर केलेले रोंबाट नृत्य मालवणवासियांच्या खास पसंतीला उतरले. या रॅलीत बच्चे कंपनीचा उत्साह पाहायला मिळाला. लहान मुले आकर्षक वेशभूषा करून रॅलीत सहभागी झाली होती. आमदार वैभव नाईक, भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह सर्वपक्षीय दिग्गजांची रॅलीला उपस्थिती राहिली.
मालवणात दरवर्षी प्रमाणे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती व समस्त मालवणवासीयांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे हे २० वे वर्ष होते. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथून या भव्य स्वागत यात्रेस प्रारंभ झाला. सुरुवातीस बबन शिंदे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले तर आमदार वैभव नाईक, दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. पंकज दिघे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
ही स्वागत यात्रा भरड येथून बाजारपेठ मार्गे बंदर जेटी ते फोवकांडा पिंपळ ते मामा वरेरकर नाट्यगृह अशी काढण्यात आली. या यात्रेत पारंपारीक हिंदू वेशातील तसेच भगवे फेटे परिधान करून महिला व पुरुष सहभागी झाले होते. तर बच्चे कंपनीने विविध पौराणिक व थोर पुरुषांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. उंट व घोडे यांच्यावर ऐतिहासिक व पौराणिक वेशभूषा केलेल्या मुलांनी स्वार होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वायरी येथील महिलांचे वारकरी मंडळाने टाळ मृदूंगाच्या तालावर अभंग व भक्तीगीते सादर करीत यात्रेत भक्तिमय वातावरण निर्माण केले. तर तारकर्ली येथील भूषण जुवाटकर या तरुणाने निळ्या रंगात सागराची वेशभूषा करीत समुद्रात मानवाकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा देखावा करीत सागरी जैवविविधता वाचवा असा संदेश दिला.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य महिला ग्रुपच्या वतीने महिलांचे रोंबाट सादर करण्यात आले. यामध्ये अनेक महिला, तरुणी व लहान मुलांनी अनेक पौराणिक पात्रे साकारत या यात्रेत रंगत आणली. या यात्रेत यावर्षी प्रथमच गोवा बार्देश येथील बार्देश शिमगोत्सव समितीचे रोंबाट आयोजकांकडून आमंत्रित करण्यात आले.
यात्रेत सहभागी झालेल्या या रोंबाटमधील ढोल ताशा वादक व कलाकारांनी पताका नाचवत, पारंपारिक गीते व नृत्य सादर करत या यात्रेत एक वेगळेपण आणले. दत्ता सामंत यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला.
ही स्वागत यात्रा व रोंबाट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मालवणवासिय उपस्थित होते. या यात्रेत आमदार वैभव नाईक, भाजपा नेते दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, धोंडू चिंदरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश कांदळगावकर, हरी खोबरेकर, बबन शिंदे, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, सौरभ ताम्हणकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, सन्मेष परब, सेजल परब, नरेश हुले, किरण वाळके, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, राजू बिडये, ललित चव्हाण, शेखर गाड, दिलीप बिरमोळे, राजा गावकर, पंकज सादये, गणेश कुडाळकर, अंजना सामंत, महेश जावकर, पूजा करलकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, मंदार ओरसकर, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, आकांक्षा शिरपूटे, सिया धुरी, विजय नेमळेकर, मुकेश बावकर, महेश सारंग, परशुराम पाटकर, विकी तोरसकर सूर्यकांत फणसेकर, मधुकर चव्हाण यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, मालवणवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.