“भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात “भगवेमय” वातावरण !

स्पर्धा यशस्वी करणाऱ्या प्रत्येक घटकाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मानले आभार

भगवा चषक स्पर्धेची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून दखल ; अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्फत “खास” संदेश

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणच्या बोर्डिंग मैदानावर १५ ते १९ मार्च दरम्यान “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक” क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. प्रत्येक पदाधिकारी, शिवसैनिकाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तन, मन, धन अर्पून काम केले. त्यामुळेच ही क्रिकेट स्पर्धा कमालीची यशस्वी झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात भगवामय वातावरण पाहायला मिळाले. आगामी काळात देखील मालवणच्या क्रीडा, पर्यटन विकासा बरोबरच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटीबद्ध असेल, हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा संदेश स्पर्धेच्या निमित्ताने संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी दिल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, यशवंत गावकर, अक्षय भोसले, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, भगवा चषक क्रिकेट स्पर्धा सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, क्रीडारसिकांच्या सौजन्याने उत्साहात पार पडली. माजी नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, बाबी जोगी, नितीन वाळके, सन्मेष परब,उमेश मांजरेकर, सिद्देश मांजरेकर, चंदू खोबरेकर, जयदेव लोणे, अन्वय प्रभू, राका रोगे, किरण वाळके, यतीन खोत, महेश जावकर, नरेश हुले, अक्षय भोसले यांच्यासह सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली. खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, अरुणभाई दुधवडकर, संदेश पारकर, मंदार शिरसाट यांसह वरिष्ठ पदाधिकारी सर्व सरपंच, पदाधिकारी यांनी उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. मालवण तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या आपण पाठीशी आहोत, हा संदेश यानिमित्ताने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आपला संदेश अरुणभाई दुधवडकर यांनी आणला. या स्पर्धेसाठी पंच, गुणलेखक, सामनाधिकारी, मंडप डेकोरेटर यांचेही सहकार्य लाभले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. येत्या काळात बोर्डिंग मैदानाचे वेगळेपण जपण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. स्पर्धा पार पडल्यानंतर शिवसैनिकांनी मैदानाची साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला आहे, असेही ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!