हिंदू नववर्षानिमित्त उद्या मालवणात भव्यदिव्य शोभायात्रा ; बार्देश गोवा येथील रोंबाट नृत्य खास आकर्षण
लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा ; स्थानिकांच्या सहभागातूनही विविध कार्यक्रम
मालवण : गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष निमित्ताने मालवण वासियांच्या वतीने बुधवारी २२ मार्च सायंकाळी ४. ३० वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य शोभयात्रा काढण्यात येणार असून यावर्षी शोभायात्रेत बार्देश गोवा येथील पारंपरिक सादरीकरणातील भन्नाट रोंबाट नृत्य खास आकर्षण असणार आहे. ढोल ताश्यांचा गजर, घोडे, चित्ररथ, विविध वेशभूषा, यासह पारंपरिक वेशभूषेतील मुले व शेकडो नागरिक यांच्या सहभागातून शोभयात्रा भव्य दिव्य स्वरुपाची असणार आहे. मालवण भरड, बाजारपेठ मार्गे, पिंपळपार अशी नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे.
गुढी पाडवा, हिंदू संस्कृती मधील चैत्रातील एक शुभ मुहूर्त. याच मुहूर्तावर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. शकांनी हूणांचा पराभव केला. आणि याच मुहूर्तावर प्रभू रामचंद्र वनवास संपवून स्वगृही परतले. चैत्रातील पालवी सुद्धा याच मुहूर्तावर निसर्गाला नवचेतना देत असते. याच अध्यात्मिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीवर आपल्या नववर्षाची स्थापना झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मालवणवासीयांनी भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन केले आहे. शोभायात्रेत वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा बालवाडी ते तिसरी व चौथी ते सातवी अशा दोन गटात असणार आहे. दोन्ही गटात प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना पारितोषिक देण्यात येईल. तरी मालवणवासीयांनी या शोभायात्रेत वेळेत सहभागी व्हावे. असे आवाहन नववर्ष स्वागत यात्रा आयोजकांकडून करण्यात आले आहे.