संग्राम देसाई यांचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद

कुडाळ मधील नागरी सत्कार सोहळ्यात खा. नारायण राणे यांचे गौरवोद्गार ; सत्कार सोहळ्यात संग्राम देसाई भावूक

देसाई कुटुंब आणि राणे कुटुंबाचे कौटुंबिक संबंध ; संग्राम देसाई हे मोठे बंधू : निलेश राणे यांच्या भावना

कुडाळ : संग्राम देसाई यांनी सर्वसाधारण वकील ते आता महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद प्राप्त केले आहे. ही बाब आमच्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद व भूषणावह आहे. हे यश मिळवताना त्यांनी केलेले कष्ट, त्यांची जिद्द आणि त्यांच्या मागे असलेले अनेकांचे आशीर्वाद याचेच हे फळ आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे आयोजित ॲड संग्राम देसाई यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केले. 

सत्कार हा व्यक्तीचा नसतो. तर त्याच्या गुणांचा आणि केलेल्या कर्तृत्वाचा असतो. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणे आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असते आणि संग्राम देसाई हे या सेवेत सातत्य ठेवेल यात तिळमात्र शंका नाही असे देखील खा. राणे यांनी यावेळी सांगितले. 

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई यांचा कुडाळवासीय यांच्या वतीने नागरी सत्कार सोहळा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाला. यावेळी माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कौन्सिलचे सदस्य ॲड जयंत जायभावे, ॲड गजानन चव्हाण, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड परिमल नाईक, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोव्याचे ॲड विवेक घाडगे, सत्कार समिती अध्यक्ष अमित सामंत तसेच जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड विवेक मांडकुलकर, काका कुडाळकर, अभय शिरसाट, धीरज परब, संतोष शिरसाट, गजानन कांदळगावकर, विजय प्रभू ,ॲड, अजित भणगे, ॲड. अमोल सामंत, ॲड. आनंद गवंडे तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले, मी संग्राम देसाई यांना खूप वर्षांपासून ओळखत आहे. जेव्हा मी सिंधुदुर्गात ९० साली आलो त्यावेळी पहिली भेट त्यांचे वडील ॲड डी. डी. देसाई यांच्यासोबत झाली आणि ते नंतर माझे चांगले मित्र झाले. असे सांगून त्यांच्या आठवणींना खा. राणे यांनी उजाळा दिला.

यावेळी माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे म्हणाले, मालवणला जेव्हा राजकोटवर घटना घडली तेव्हा संग्राम देसाई मला फोन करत होते. जेव्हा मी त्यांना फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की येत्या काळात निवडणूक आहे. जास्त तुम्ही आक्रमक होऊ नका. अशी काळजी घेणारा व्यक्ती हा घरातील असू शकतो. देसाई कुटुंब हे राणे कुटुंबाशी जवळचे असलेले कुटुंब आहे. त्यांचे सल्ले आम्ही नेहमीच ऐकत असतो. संग्राम देसाई हे बार कौन्सिलचे अध्यक्ष झाले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. नेहमी आमच्या पाठीशी उभे राहणारे आणि आम्हाला सांभाळून घेणारे ते मोठे बंधू आहेत असे निलेश राणे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड उमेश सावंत, सुत्रसंचलन सुमेधा नाईक, अविनाश वालावलकर यांनी केले.

सत्कार सोहळ्यात संग्राम देसाई वडिलांच्या आठवणीने भावूक 

या नागरी सत्कारावेळी संग्राम देसाई भावनिक झाले. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांची आठवण काढून ते माझे पहिले गुरू असल्याचे सांगितले. वकिली क्षेत्रामध्ये जेव्हा मी पाऊल ठेवलं आणि मला पहिली केस मिळाली ती कशी लढावी म्हणून वडिलांजवळ गेलो त्यावेळी त्यांच्या स्वभावा प्रमाणे त्यांनी माझ्याशी बोलणं केलं आणि मी नंतर त्या केस संदर्भात बऱ्याच वकिलांना भेटलो आणि त्या केस संदर्भात त्यांचा असलेला दृष्टिकोन पाहिला. तर हे लक्षात आले की प्रत्येकाचा एखाद्या केस बाबत वेगवेगळ्या दृष्टिकोन असू शकतो आणि ते माझ्या वडिलांमुळे मी शिकलो असे सांगून जरी मी मोठा झालो तरी सर्वसामान्य म्हणूनच काम करणार. माझ्या वकिली क्षेत्रामध्ये ५२ टक्के मी पैसे घेऊन वकिली करतो. पण इतर ४८ टक्के समाजसेवा म्हणून अनेकांच्या केसेस स्वखर्चाने लढतो. मला कोणावरही अन्याय झालेला आवडत नाही. मग मी त्याच्या पाठीशी कायम राहतो. हे सगळं मिळवणं एवढं सोपं नव्हतं. पण सर्व वकील मित्रांची साथ, आई-वडील आणि कुटुंबीयांचा पाठिंबा, वडीलधारी माणसांचा आशीर्वाद यामुळे हे सगळं शक्य झाले अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!