उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक : ओम साई स्पोर्ट्स म्हापण संघाची उपांत्य फेरीत धडक
मालवण : येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ डे नाईट क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांमधून ओम साई स्पोर्ट्स म्हापण विरुद्ध ब्राह्मण देव बागायत यांच्यात झालेल्या उपउपांत्य सामन्यात ओम साई स्पोर्ट्स संघाने बागायत संघावर १४ धावांनी विजय मिळवीत उपांत्य फेरीत धडक मारली.
१५ ते १९ मार्च या कालावधीत मालवण मधील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर प्रकाशझोतात होत असलेल्या या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख, उपविजेता संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अटीतटीचे सामने क्रिकेट प्रेमींना पहावयास मिळाले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेले सामने प्रत्येकी ५- ५ षटकाचे खेळविण्यात आले. ब्राह्मणदेव बागायत विरुद्ध श्री स्पोर्ट्स देवबाग यांच्यातील पहिल्या सामन्यात बागायत संघाने ६ बाद ४९ धावा केल्या. यात जयेश धुरी व शिवम कदम यांनी प्रत्येकी १६ धावांचे योगदान दिले. तर देवबागतर्फे आदित्य केळुसकर याने ३ गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना देवबाग संघ ५ बाद २३ धावा पर्यंत मजला मारू शकल्याने बागायत संघ २६ धावानी विजयी झाला. बागायत संघातर्फे ३ विकेट घेणारा सनीश मुंडे सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात स्वप्नील इलेव्हन देवबाग संघाने १ बाद ६१ धावा जमविल्या. यात तुषार रणदिवे (३३) व पपू रामघोडे (२३) यांनी सर्वाधिक धावा केल्या. अटीतटीच्या या सामन्यात प्रत्युतरादाखल खेळणाऱ्या बड्या खेळाडूंचा समावेश असलेला राजाराम वॉरीयर्स (ब) संघ ५ बाद ६० धावा करू शकल्याने अवघ्या एका धावेने राजाराम संघाचा पराभव झाला. या संघातर्फे रुतांशू पाटील (२१) याने सर्वाधिक धावा केल्या. तर देवबाग तर्फे विनी पूजारा व अमरीश यांनी चांगली गोलंदाजी करत प्रत्येकी १ विकेट घेतली. तुषार रणदिवे सामनावीर ठरला. तिसऱ्या सामन्यात जेसीबी कुडाळ संघाने दांडी बॉईज संघाचा ४१ धावानी एकतर्फी पराभव केला. कुडाळ संघाने दिलेले ६१ धावांचे लक्ष्य दांडी संघाला कुडाळ संघाच्या दमदार गोलंदाजी समोर न पेलवता ते ५ बाद १९ धावाच करू शकले. कुडाळतर्फे प्रणय गावकर व रुपेश तांडेल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले. कुडाळचा सोहेल शेख (२४ धावा) सामनावीर ठरला. चौथा सामना रंगतदार होऊन ओम साई स्पोर्ट्स म्हापण संघाने सागर किनारा दांडी संघाचा अवघ्या दोन धावानी पराभव केला. म्हापण संघाने ३ बाद ५४ धावा तर दांडी संघाने ७ बाद ५२ धावा केल्या. ४ विकेट घेणारा म्हापण संघाचा समीर वेंगुर्लेकर सामनावीर ठरला. यानंतर झालेल्या बाद फेरीतील पहिल्या सामन्यात स्वप्नील इलेव्हन देवबाग संघाने दिलेले ४६ धावांचे आव्हान ब्राह्मण देव संघाने स्वप्नील ६ गडी राखून गाठत विजय मिळवित उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. बागायत संघाचा प्रशांत पवार सामनावीर ठरला. तर दुसऱ्या सामन्यात ओमसाई स्पोर्ट्स संघाने जेसीबी कुडाळ संघाचा ३ धावानी पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. ५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेसीबी संघाची फलंदाजी कोलमडून ८ बाद ४७ धावा पर्यन्त मजल मारू शकला. म्हापण संघातर्फे समीर वेंगुर्लेकर याने २ विकेट घेतले, त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
यानंतर झालेल्या उपउपांत्य सामन्यात ओमसाई स्पोर्ट्स म्हापण संघाने प्रथम फलंदाजी करत ४ बाद ५४ धावा केल्या. मात्र लक्ष्याचे पाठलाग करताना ब्राह्मणदेव बागायत संघ ६ बाद ४१ धावाच करू शकल्याने म्हापण संघाने विजय मिळवीत उपांत्य फेरीत धडक मारली. २ विकेट घेणारा म्हापण संघाचा समीर वेंगुर्लेकर सामनावीर ठरला. दुसऱ्या दिवशी झालेल्या सामान्यांमधून तीन सामन्यात समीर वेंगुर्लेकर याने सामनावीर किताब मिळविला.
या स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून बंटी केरकर, पंच म्हणून ऍम्बरोज आल्मेडा, उमेश मांजरेकर, दीपक धुरी, मंगेश धुरी, सुशील शेडगे, गुणलेखक गणेश कृष्णा राऊळ, पायस आल्मेडा, समालोचक म्हणून शाम वाक्कर, बादल चौधरी, प्रदीप देऊलकर, नाना नाईक, उत्तम मुणगेकर हे काम पाहत आहेत.