वाढदिवस विशेष : राजू परुळेकर, माजी उपसभापती, पं. स. मालवण
“राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा निर्मळ चेहरा…. “
कुणाल मांजरेकर ( मालवण)
सतीश दामोदर उर्फ राजू परुळेकर…. मालवण तालुक्याच्या राजकीय पटलावरील स्वच्छ प्रतिमेचा एक निर्मळ चेहरा… मालवण तालुक्यातील मठबुद्रुक गावात १४ मार्च १९७२ रोजी जन्मलेल्या राजू परुळेकर यांचा आज ५१ वा वाढदिवस. वयाची तब्बल ३५ वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करणाऱ्या राजू परुळेकर यांचा स्वभावगुण म्हणजे त्यांच्यातील “साधेपणा…”. मठबुद्रुक गावचे तब्बल तीनवेळा सरपंच पद आणि मालवण पंचायत समितीमध्ये उपसभापती आणि सदस्य म्हणून काम केलेले राजू परुळेकर कधीही साहेब बनले नाहीत. सर्वसामान्य जनता असो अथवा वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्यासाठी ते “राजू” बनूनच राहिले. आज त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा होतोय, या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा….
राजू उर्फ सतीश दामोदर परुळेकर हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील. मालवण तालुक्यातील मठबुद्रुक गावात परुळेकर कुटुंब हे एकत्रित कुटुंब व्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. या कुटुंबात दीडशे सदस्य आहेत. मात्र आजही “एक घर एक चुल” ही परंपरा परुळेकर कुटुंबाने जपली आहे. राजू परुळेकर यांचे वडील दामोदर परुळेकर हे प्राथमिक शिक्षक होते. राजू परुळेकर यांचा जन्म झाला त्यावेळी रत्नागिरी हा अखंड जिल्हा होता. त्यामुळे त्यांचं बालपण रत्नागिरी, दापोली, मंडणगड येथे गेलं. तर कणकवली कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी दशेत भारतीय विद्यार्घी सेनेच्या माध्यमातून त्यांना राजकारण आणि समाजकारणाचे वेध लागले. १९९३ मध्ये कणकवली कॉलेज मध्ये “युआर” म्हणून त्यांनी विद्यार्थी दशेत राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली.
परुळेकर कुटुंब हे मूळ काँग्रेसचे. पण अनंत राऊत यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या कार्याने प्रभावित होऊन ते शिवसेनेत आले. शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा श्री गणेशा केला. १९९५ मध्ये मठबुद्रक गावचे उपसरपंच पद स्वीकारल्या नंतर राजकीय जीवनात त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. दोनवेळा सरपंच म्हणून त्यांनी गावच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले. मठबुद्रुक हा दुर्गम गाव. भौगोलिक दृष्ट्या तीन तालुक्यात गावाची विभागणी झाल्याने काम करताना अनेक अडचणी येत होत्या. मालवण तालुक्याचा एक भाग असलेला हा गाव देवगड मतदार संघासोबत जोडला गेला. तर कणकवलीची बाजारपेठ या गावाला अतिशय जवळची बाजारपेठ. त्यामुळे आमदारकीच्या कामासाठी या गावाला देवगडवर अवलंबून राहावं लागत होत. तर बाजारपेठ आणि अन्य कामासाठी कणकवली गावावर. शासकीय कामासाठी मालवणमध्ये यावे लागत होते.. अशा परिस्थितीत राजू परुळेकर यांनी मठबुद्रुक गावच्या विकासाचे शिवधनुष्य पेलले. देवगडचे आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने विकासासाठी त्यांनी निधी कमी पडू दिला नाही. तर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून गावात मोबाईल टॉवर त्यांनी उवलब्ध करून दिला.
गावच्या सामाजिक विकासासाठी त्यांनी श्री देव विरदेव चाळेश्वर क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. गेली ३३ वर्षे या मंडळाच्या माध्यमातून पंचक्रोशीत विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात येतात. त्या सोबत महिलांसाठी शिलाई मशीन वाटप, शिबिरे, पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी बंधारे, सामूहिक शेती असे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. राजू परुळेकर यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सिमा परुळेकर यांनी राजकीय क्षेत्रात मोठ काम केल आहे. राजू यांनी सरपंच, पं. स. सदस्य, उपसभापती अशी पदे भूषवली आहेत. तर सो. सिमा परुळेकर यांनी सरपंच, पं स सदस्य आणि सभापती आदी पदावर काम केल आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ गावसाठी निर्मल ग्राम योजना जाहीर केली. त्यावेळी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील फक्त पाच ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता. यात राजू परुळेकर यांच्या मठबुद्रुक गावाचा देखील समावेश होता. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते राजुचा नवी दिल्लीत सत्कार करण्यात आला.
त्यांच्या पत्नी सिमा परुळेकर यांनीही आपल्या गावाला निर्मल गाव पुरस्कार मिळवुन दिला होता. त्यामुले तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला.
मालवण मध्ये गाजल्लेल्या झेंडा आंदोलनात देखील राजू परुळेजर यांनी सक्रिय सहभाग घेतला. अनंत राऊत यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीकडे जाणारे रस्ते टायर जाळून त्यांनी रोखत प्रशासना समोर आव्हान उभे केले होते. विविध आंदोलनात सहभागी होऊन आपल्यातील आक्रमक बाणा त्यांनी दाखवून दिलाय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दत्ता सामंत यांच्या संपर्कात ते आले. भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या नेत्रुत्वाखाली त्यांनी विभागात विकास कामांचा धडाका सुरु केला. विभागातील जनतेने दिलेल्या सहकार्यामुळे आपण गेले ३५ वर्षे काम करू शकलो असे ते अभिमानाने सांगतात. याचे श्रेय माझं कुटुंब, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक, मित्रपरिवार आणि महत्वाचं म्हणजे मतदारांना जात असल्याचं ते सांगतात. दिवंगत आमदार आपासाहेब गोगेटे, नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, राजन तेली, दत्ता सामंत, अनंत राऊत यांच्या सह सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रेमामुळे राजकीय जीवनात मी यशस्वी होऊ शकलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.