तारकर्ली रांजनाल्यातील बांधकामा विरोधात ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरु…
कांदळवनाची तोड झाल्याचा आरोप ; अधिकारी वर्ग अनधिकृत बांधकामाला घालतायत पाठीशी
संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अतिक्रमणावर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील रांजनाल्यात कांदळवनाची अनधिकृत तोड करून हॉटेलचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप तेथील ग्रामस्थानी केला आहे. मागील वर्षभर हे बांधकाम सुरू असताना प्रशासनाकडून या अनधिकृत बांधकामाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करीत येथील ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालया समोर सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरू केलेआहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई व्हावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील या मागणी बाबत सकारात्मक प्रतिसाद अधिकारी वर्गाकडून देण्यात आला नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तारकर्लीच्या सरपंच सौ. मृणाली मयेकर, उपसरपंच बजरंग कुबल यांच्यासह ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले आहेत. भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली.
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, तारकर्ली हद्दीत रांजनाला असुन तो डोंगर पायथा ते तारकर्ली समुद्र किनारा असा बारमाही वाहणारा नैसर्गीक प्रवाह आहे. सदर रांजनाल्यावर पुल बांधण्यात आले असून पावसाळ्यात सदरचा रांजनाला उग्र स्वरुप धारण करतो. त्याच्या प्रवाहात कोणताही अडथळा निर्माण झाल्यास त्याचा संपूर्ण तारकर्ली गावाला धोका निर्माण होतो. याबाबतच्या संपूर्ण वस्तुस्थितीची पूर्वकल्पना असुन देखील तारकलीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. जितेंद्र शिवाजी केरकर यांनी सदर रांजनाल्यातील कांदळवनाची राजरोसपणे तोड करुन, भराव व दगड टाकुन हा रांजनाला प्रवाह अडविला आहे. रांजनाला प्रवाह अडविल्यामुळे भविष्यात संपूर्ण तारकर्ली गावाला धोका निर्माण झालेला आहे. डोंगर माथ्यावरुन येणारे पावसाचे पाणी प्रचंड वेगाने या रांजनाला प्रवाहातुन बाहेर पडुन समुद्राला मिळते. परंतु श्री. केरकर यांनी हा नैसर्गिक प्रवाह अडविल्यामुळे भविष्यात तारकर्ली गावात जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात आपणास यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करुन देखील अजुनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तरी सदर वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करुन संबंधितांवर ठोस कारवाई करुन, रांजनाला प्रवाह खुला करुन मिळण्याची कार्यवाही व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे.
सोमवार पासून येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र मंगळवारी देखील ग्रामस्थांच्या मागणीबाबत सकारात्मक तोडगा निघू न शकल्याने हे उपोषण सुरू होते. या उपोषणात सरपंच मृणाली मयेकर, उपसरपंच बजरंग कुबल, वैभव सावंत, सुरेश बापार्डेकर, सागर चव्हाण, बापूजी चव्हाण, सुनिल चव्हाण, प्रफुल्ल मांजरेकर, दत्तराज चव्हाण, कपिल चव्हाण, संतोष देऊलकर, भालचंद्र चव्हाण, जयवंत सावंत, अजिंक्य पारकर, प्रतिक कुबल, गजानन कुबल, महेंद्र चव्हाण, अनिल झाड, संतोष झाड, प्रकाश गोसावी, संदेश सावंत, मिथिलेश मिठबावकर, प्रेरणा सावंत, गणेश साळगावकर, मोहन केळूसकर, देवा नेवाळकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.