कडक उन्हाळ्याच्या दिवसात मुक्या प्राण्यांची पाण्यासाठी वणवण थांबणार…
सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत, डॉ. प्रसाद धुमक यांचा मालवणात आदर्शवत सामाजिक उपक्रम
मालवण : जागतिक प्राणिमित्र दिनाचे औचित्य साधून प्राण्यांना शुद्ध पाणी मिळण्याच्या स्तुत्य हेतूने मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्यां तथा प्राणीमित्र सौ. शिल्पा यतीन खोत आणि डॉ. प्रसाद धुमक यांनी पुढाकार घेतला आहे. प्राण्यांसाठी मालवण शहरात पाण्याची शंभर भांडी ठेवण्यात आली असून या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे.
उन्हाळा सुरु झाला असून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कालावधीत पशुपक्ष्यांनाही पाण्याची गरज असते. त्यांची तहान भागविणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. शहरात पक्षी प्राणी यांचा वावर सर्वत्र असतो. पावसाळ्यात त्यांना कुठेही पाणी उपलब्ध होते. मात्र, आताच्या कडक उन्हात प्राण्यांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. उष्म्याचा त्रास प्राण्यांना झाल्याच्या अनेक घटना आहेत. प्राण्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्राणीमित्र खोत आणि डॉ. धुमक यांनी प्राण्यांना पाणी मिळावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरात प्राण्यांच्या पाण्यासाठी भांडी घेण्यात आली आहेत. यासाठी वॉटर फॉर व्हॉईसलेस या संस्थेची मदत लाभली आहे. तसेच उपक्रमासाठी गोवा येथील उद्योगपती काकाजी वळंजू यांनी पाण्याची भांडी मालवण येथे उपलब्ध होण्यासाठी दळणवळण सुविधा उपलब्ध करून दिली.
या उपक्रम दरम्यान विष्णू मसके, रमण पेडणेकर, कमलेश चव्हाण, सहदेव साळगावकर, प्रभाकर वाळके, सुप्रिया पेंडुरकर, दर्शन वेंगुर्लेकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, गौरी कुमामेकर, स्वाती पारकर, निनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते. या उपक्रमात मालवणवासीयांनी सहभागी होण्यासाठी सौ. शिल्पा यतीन खोत मोबा. 9326477707 डॉ. प्रसाद धुमक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे.