“एमआयटीएम” कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
निबंध स्पर्धेसह प्रश्न मंजुषा, काव्य वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर : जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने सोमवारी कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कॉलेज मध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा आणि काव्य वाचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कॉलेजच्या ग्रंथालय विभागाने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रारंभी प्राचार्य एस. सी. नवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्गघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा. विशाल कुशे, प्रा. तुषार मालपेकर, संगणक विभागाचे प्रमुख मनोज खाडीलकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रंथालय विभागाच्या प्रमुख सौ. अपर्णा मांजरेकर यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाची थोडक्यात माहिती देत आगामी काळात मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त प्रयत्न करूया, असे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य नवले म्हणाले, आजच्या युगात मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात अभियांत्रिकीचे शिक्षणही मातृभाषेतून मिळणार आहे. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील मराठी वाचनावर भर द्यावा, ग्रंथालयातील शिवसंग्रहालय तसेच मराठी साहित्य वाचण्याचे आवाहन प्राचार्य नवले यांनी केले. यावेळी कु. मयुरी घाडी, कु. समता पाटील या विद्यार्थिनींनी मराठी भाषेबाबत आपले विचार मांडले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत डिप्लोमा विभागात रामचंद्र प्रशांत सावंत, सुमित भिसाजी परब, तुषार अनिल घाडी तर डिग्री विभागात महेश शेखर राठोड, समता संभाजी पाटील, ओंकार विजय पवार यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले. शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मयुरी दिवाण यांनी प्रथम तर प्रथमेश जठार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. तुषार मालपेकर आणि प्रा. तुषार तळकटकर यांनी केले. यावेळी प्रथमेश पालव, ऐश्वर्या पालव, साक्षी जिकमडे, रामचंद्र सावंत, सुमित परब, श्रेया पाटील यांनी कविता वाचन केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून प्रा. रोशनी वरक यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश पालव या विद्यार्थ्याने केले. तर चित्रांगी मेस्त्री या विद्यार्थीनीने आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. भाग्यश्री वाळके, ग्रंथालय कर्मचारी सायली पाटकर, मकरंद मेस्त्री यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमांस सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.