मालवण नगरपालिकेकडून मच्छिमार्केट ते दांडेश्वर किनारपट्टी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर

सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांचा पुढाकार ; स्थानिकांच्या मदतीने दोन महिन्यात किनारपट्टी स्वच्छ करण्याचा संकल्प

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहर हे जागतिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील किनारे देशी विदेशी पर्यटकांना नेहमी भुरळ घालतात. दांडी किनारपट्टीवर तर वॉटर स्पोर्ट्ससाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक उपस्थिती दर्शवतात. मात्र शहरातील मच्छीमार्केट ते दांडेश्वर किनारपट्टी परिसर स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी स्थानिकांच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा श्री. ताम्हणकर यांच्या पुढाकारातून नगरपालिका स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाचारण करून स्थानिकांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत किनारपट्टी स्वच्छतेसाठी नगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यानुसार दररोज सकाळी ठराविक वेळेत नगरपालिकेची घंटागाडी या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी येणार असून येत्या दोन महिन्यात ही संपूर्ण किनारपट्टी स्वच्छ करण्याचा संकल्प स्थानिकांच्या मदतीने आणि नगरपालिकेच्या सहकार्याने केल्याची माहिती श्री. ताम्हणकर यांनी दिली आहे. या बैठकीत ठरल्यानुसार मंगळवारी सकाळ पासून नगरपालिकेच्या घंटागाडीने मच्छीमार्केट ते दांडेश्वर किनारपट्टीचा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.

मालवण शहर जागतिक पर्यटनाचे ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने देशी विदेशी पर्यटक उपस्थिती दर्शवतात. येथील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळते. मात्र मच्छी मार्केट ते दांडेश्वर किनारपट्टीचा परिसर नेहमीच अस्वच्छ असल्याचे दिसून येते. या परिसर स्वच्छतेसाठी अनेकांनी प्रयत्न करूनही त्यामध्ये अपेक्षित यश आले नाही. या पार्श्वभूमीवर युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी या किनारपट्टीचा परिसर स्वच्छ करून मासेमारी बरोबरच येथील पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत श्री. ताम्हणकर यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा दांडी आवार येथे नगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिकांनीही किनारपट्टी स्वच्छतेसाठी सहकार्याचा हात देण्याचे अभिवचन दिले. यावेळी स्थानिकांनी कचऱ्या बाबतच्या आपल्या समस्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. याप्रसंगी नगरपालिकेच्या पुढाकारातून मच्छी मार्केट ते दांडेश्वर किनारपट्टी स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही उपस्थित पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मच्छी मार्केट कडे मोठ्या प्रमाणात ओला कचरा जमा होतो. हा कचरा नियमित उचलण्याचे नियोजन देखील यावेळी करण्यात आले.

या बैठकीला नगरपालिकेचे अधिकारी निखिल नाईक, शिवाजी शिंदे, मंदार केळूसकर, मिथुन शिगले, श्री. वळंजू, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर, निशय पालेकर, महेश यमकर, दादा कोचरेकर, विकी पराडकर, दिवाकर जाधव, सागर कापडोसकर, अरुण जाधव, आदित्य मोरजे, समीर मुंबरकर, अविनाश चोडणेकर, अँड्र्यू डिसोझा, संतोष देसाई, रोजिना फर्नांडीस, बबु व्हर्देकर, डॉमनिक ब्रिटो, पॉल फर्नाडीस, शाना,
तन्मय यमकर, प्रथमेश नाईक, अजय मोरजे, मॅक्सी फर्नांडीस, डॅनियल फर्नांडीस, आदेश मांजरेकर, कैलास रेडकर आदी उपस्थित होते. या बैठकीत ठरल्यानुसार पालिकेची घंटा गाडी येथील कचरा जमा करण्यासाठी मंगळवार पासून दाखल झाली. याबाबत सौरभ ताम्हणकर यांनी पालिका प्रशासन आणि मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानत ही कार्यवाही सातत्याने सुरु राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!