निलेश राणेंचे प्रयत्न : मालवण तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निलेश राणेंकडून जास्तीत जास्त निधी आणून झुकते माप : धोंडू चिंदरकर
मालवण | कुणाल मांजरेकर
मागील अडीच वर्ष विकासात्मक निधी पासून कोसो दूर असलेल्या मालवण तालुक्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यातून मालवण तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.
वेगवेगळ्या विकास कामात प्राप्त निधीत प्रत्येक हेडला मालवणची विशेष छाप जिल्हास्तरावर निधीच्या रूपात दिसलेली आहे. याची सविस्तर माहिती प्रत्येक गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवणवर अन्याय होता कामा नये याची विशेष काळजी घेतली आणि याकामी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काटेकोरपणे पालन करत विशेष सहकार्य केले. याबद्दल आपण या सर्व नेत्यांचे मालवण तालुक्याच्या वतीने जाहीर ऋण व्यक्त करतोच पण येणाऱ्या बजेट मध्ये मालवण तालुक्यातील बहुतांशी कामे सुद्धा मालवण तालुक्याचीच राहतील याची काळजी घेतली जाईल आणि तसा पाठपुरावा करून कुठल्याही गावावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असे धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.