पोवाडा, शिवस्फूर्तीगीतांसह विविधांगी कार्यक्रमांनी “एमआयटीएम” मध्ये शिवजयंती उत्साहात

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्गवरून आणलेल्या शिवज्योतीने वातावरण शिवमय

ओरोस | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ओरोस येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. अफजलखानाच्या वधावर आधारित पोवाड्यासह छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत गीते यावेळी सादर करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्ग वरून आणलेल्या शिवज्योतीचे कॉलेजच्या प्रांगणात उत्साहात स्वागत करून पूजन करण्यात आले. या निमित्ताने “जय शिवाजी, जय भवानी” च्या घोषणांनी कॉलेजचा परिसर दुमदुमून गेला.

जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाही शिवजयंती निमित्ताने सकाळी ६ वाजता कॉलेज कडून विद्यार्थी मशाल पेटवण्यासाठी किल्ले सिंधुदुर्गकडे निघाले. त्यानंतर किल्ल्यावर जाऊन शिवज्योत प्रज्वलित केल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा कॉलेजकडे माघारी फिरले. यामध्ये मुलांबरोबर मुलीही सहभागी झाल्या होत्या. यात चित्रागी मेस्त्री, पूर्वा परब, मयुरी घाडी, ऐश्वर्या पालव यांचा समावेश होता.

सकाळी ८.३० वा. ही शिवज्योत घेऊन विद्यार्थी कॉलेजच्या दिशेने रवाना झाले. सकाळी १०.३० वा. कॉलेजमध्ये ज्योत दाखल झाल्यानंतर प्रा. विशाल कुशे यांनी मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सुदेश जामसंडेकर या विद्यार्थ्याने शिवगर्जना सादर केली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये शिवरायांवर आधारीत गीते, पोवाडा अशा कार्यक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमामध्ये प्रा. सिद्धार्थ जाधव तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याचे दिग्दर्शन कॉलेजचे शिक्षक तुषार तळकटकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रा. विशाल कुशे, रामचंद्र सावंत, ॲकॅडमिक डीन पूनम कदम, ॲडमिनिस्टर राकेश पाल विद्यार्थ्यांमधून सुदेश जामसंडेकर आणि पूर्वा परब उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून विलास पालव, प्रा. रोशनी वरक, योगेश आईर, प्रा. अनिकेत देसाई, शंकर सावंत, प्रा. स्वागत केरकर, प्रा. ऋषिकेश नाईक, प्रथमेश जठार, प्रा. ॲश्ले फर्नांडिस, सिद्धेश शिंदे तसेच विद्यार्थ्यांमधून यश कांदळकर, मयुरी घाडी, शुभम बकाळकर, प्रथमेश पालव, साक्षी जिकमडे, समीर पवार यांनी विशेष मेहनत घेतली. कॉलेजच्या टेरेसवरून महाराजांचा बॅनर झळकावून मानवंदना देण्याचे काम दिनार लाड, राज वरेरकर या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पालव या विद्यार्थीनीने केले तर विलास पालव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!