केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद !
विद्यार्थी वर्गाने जिद्दी व महत्वाकांक्षी बनून नोकरी पेक्षा उद्योगाकडे वळण्याचा राणेंचा सल्ला
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाशी मुक्त संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ना. राणे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी जिद्दी व महत्वाकांक्षी बनून नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, असा गुरुमंत्र त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ना. नारायण राणे सध्या जिल्ह्यातील शाळा, कॉलेज मध्ये विद्यार्थी वर्गासोबत मुक्त संवाद साधत आहेत. त्या अंतर्गत त्यांनी सोमवारी दुपारी हायस्कुल हायस्कुल मध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शाळेतील शिक्षक करत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करावे. तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केलात तर विद्यार्थी कोणत्याही संकटांना तोंड देऊ शकतात, असे ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गाशी संवाद साधत आहोत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव विजय कामत, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तप्रसाद खानोलकर, डॉ. मिलींद कुलकर्णी, विजय केनवडेकर यांच्यासह अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी आणि राणेंचा दिलखुलास संवाद
श्रेयस बर्वे या विद्यार्थ्याने पाचवी व सातवी स्कॉलरशिपमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला एक हजार स्कॉलरशिप मिळत असून स्कॉलरशिपच्या रकमेत वाढ होण्यासाठी काय करता येईल? असा प्रश्न उपस्थित केला. यावर नारायण राणे यांनी स्कॉलरशिपची रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कैवल्य सागर मिसाळ याने स्पर्धा परीक्षांसाठी जिल्ह्यात कोणत्या सुविधा उपलब्ध करता येतील असा प्रश्न विचारला यावर नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र व सुसज्ज लायब्ररी उभारणार असल्याचे स्पष्ट केले. वेदांत नाईक या विद्यार्थ्याने मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी कोणते उपाय करता येतील? असा प्रश्न उपस्थित केला. यावर नारायण राणे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मराठी शाळा सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले. अमूल्या साटम हिने सिंधुदुर्गात इंटरनेटची सोय योग्य पद्धतीने नसल्याने अभ्यास करताना अडणची असल्याचे सांगितले. यावर नारायण राणे यांनी फायव्हजीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन नूरजहाँ नाईक यांनी केले तर आभार देविदास वेरलकर यांनी मानले.