पत्रकारितेच्या पेशाचे पावित्र्यं टिकवणं प्रत्येक पत्रकाराचा धर्म

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या उदघाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी : पत्रकारिता हा पेशा आहे, व्यवसाय नाही. त्यामुळे त्याचं पावित्र्य टिकवणं हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे. मात्र आपण काय योगदान देतोय याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी समाज प्रबोधन होऊन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय या पत्रकार भवनातून हाताळले जावेत, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केली.

ना. राणे यांच्या हस्ते फित कापून तसेच कोनशिला अनावरण करुन पत्रकार भवनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पद्मश्री परशुराम गंगावणे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, अण्णा केसरकर, नंदकिशोर महाजन, शशी सावंत, गणेश जेठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री ना. राणे म्हणाले, आज राज्यभरातील पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज झाले आहे. या स्मारक व भवन उभारण्या पाठीमागे सर्व पत्रकारांचे योगदान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाकडे पाहून चांगले गुण आत्मसात करावेत. पत्रकारितेत त्यांनी सांगितलेलं पावित्र्यं जोपासले आहे का? अंगिकारले आहे का? त्याचा अंमल होतो आहे का? याचा विचार मंथनातून व्हावा. त्यावेळची पत्रकारिता, आता कुठे गेली ? याचाही विचार व्हायला हवा. पत्रकारिता हे आयुध आहे. त्यासाठी अभ्यास लागतो. विकास, बेकारी, जीडीपी, उद्योगधंदे, रोजगारावर वृत्तपत्रातून मार्गदर्शन व्हायला हवे. त्यासाठी आवश्यक पोषक वातावरण बनवणं पत्रकारांचं काम आहे. पत्रकार परिषदेत विकासावर प्रश्न असावेत. जिल्ह्याच्या विकासाला पोषक, समृध्दीचं वातावरण निर्माण करावं, समाजाला प्रेरणा देऊन उत्तेजन देवून, समाजाचं प्रबोधन करुन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय भवनातून हाताळले जातील, लिहिले जातील, असं काम व्हायला हवं. आपला जिल्हा देशात समृध्द जिल्हा म्हणून ओळखला जावा. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आमदार नितेश राणे म्हणाले, काळानुरुप पत्रकारितेत झालेल्या बदलांची दखल जिल्ह्यातील पत्रकारांनी घ्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पत्रकार भवनात व्हावा. या भवनातून विचार मंथन होऊन विकासात्मक पत्रकारिता घडत जावी. जिल्ह्यात एक दर्जेदार पत्रकार भवन उभे रहावे, अशी सर्व पत्रकारांची इच्छा होती ती आज यानिमित्ताने पूर्णत्वास आली आहे.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे स्मारक व पत्रकार भवन पूर्णत्वास आणल्याबद्दल सर्व आजी-माजी पत्रकार व अधिकारी यांचे अभिनंदन केले. राज्यातील जिल्ह्यातील प्रशासन व पत्रकारांनी मिळून एवढा मोठा प्रकल्प पूर्ण केला आहे. हे काम जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी करुन दाखविले. स्मारकाची देखभाल दुरुस्ती पुढे कशी करता येईल, याचेही नियोजन करावे. याही पुढच्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पत्रकारितेचा वारसा कथन केला. या स्मारकासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास सांगितला आणि पत्रकार भवन उभारणी सहाय्य केलेल्या सर्व पत्रकार, प्रशासन व पक्षाचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करुन या भवनाच्या पुढील वाटचालीचा संदर्भ दिला. जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. एम. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली. या निमित्ताने जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. जयानंद मठकर यांचे वारसदार, कै. श्रीधर मराठे यांचे वारसदार, माजी अध्यक्ष गजानन नाईक, संतोष वायगंणकर, वसंत केसरकर, शशी सावंत, गणेश जेठे, स्मारकातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या मुर्तीचे शिल्पकार विलास मांजरेकर व वास्तुतज्ज्ञ अमोल नष्टे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, शाखा अभियंता विनायक जोशी, संजय दहीफळे, उपअभियंता युतिका केणी यांना सन्मानित करण्यात आले. अर्चना घारे-परब यांनी पत्रकार भवनाला शंभर पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन निलेश जोशी व ज्योती तोरसकर यांनी तर आभार प्रदर्शन गणेश जेठे यांनी केले. यावेळी विविध प्रसार माध्यमांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!