ओरोस येथील पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन ; ना. दीपक केसरकर यांनीही दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्य जतन करुन बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचं स्मारक मराठी पत्रकारांना, भावी पत्रकारांना प्रेरणा देणारं ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करुया. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारं ठरेल. भविष्यातही जे जे आवश्यक आहे. ते ते सरकार पूर्ण करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनीही दूरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती ती आता साकार झाली आहे. या पुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिले जातील.असेही ते म्हणाले.