मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास मनसे पालिकेसमोर आंदोलन छेडणार

माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवा बाबत मनसेने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून देखील याबाबत मालवण नगरपरिषदेने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्याचा परिणाम म्हणून देऊळवाडा येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने आई व मुलाला दुखापत झाली आहे. याबाबत येत्या दहा ते पंधरा दिवसात पालिकेने उपाययोजना न आखल्यास मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिला आहे.

मालवण मधील लहान मुलावर व त्याच्या आईवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून मुलाच्या पायाला चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. हा अतिशय भीतीदायक विषय आहे. यापूर्वी भटक्या कुत्र्यांचा विषय मनसेतर्फे मालवण नगरपरिषदेच्या निदर्शनास आणला होता. परंतु त्यावर दुर्लक्ष झाले. याबाबत कोणतीही समाधानकारक कार्यवाही करण्यात आली नाही. याअगोदर गाडीसमोर कुत्रे आल्याने बरेच अपघात देखील झाले आहेत. असे वारंवार घडत आहे. तरीही प्रशासन यावर पूर्ण दुर्लक्ष करत आहे. अलीकडे घडलेल्या प्रकाराने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नगरपरिषदेने येत्या 10 ते 15 दिवसात भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त लावावा. अन्यथा मनसेतर्फे मालवण नगरपरिदेच्या बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विशाल ओतवणेकर यानी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!