यंत्रणांचा वापर करून धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव मिळवला, पण “शिवसैनिक” कसा मिळवणार ?
हरी खोबरेकर ; शिवसैनिकांच्या भावनांचा बाण जेव्हा सुटेल तेव्हा धनुष्य पेलण्याची ताकद गद्दार गटाच्या मनगटात राहणार नाही
मालवण | कुणाल मांजरेकर
निवडणूक आयोगाने आठ महिन्यांच्या सुनावणीनंतर “धनुष्यबाण” आणि “शिवसेना” हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही यंत्रणांचा वापर करून धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव मिळवला असला तरी “शिवसैनिक” कसा मिळवणार ? असा सवाल करून शिवसैनिकांच्या भावनांचा बाण जेव्हा सुटेल, तेव्हा धनुष्य पेलण्याची ताकद गद्दार गटाच्या मनगटात राहणार नाही, असे श्री. खोबरेकर यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हरी खोबरेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आणि बाळासाहेबांच्या वचनाशी बांधील आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा वापर करून चिन्ह आणि नाव घेण्याचा जरी प्रयत्न केला असेल, तरी शिवसैनिक कदापि तुमचा होऊ शकत नाही. शिवसैनिक गद्दारांना थारा देणार नाही. या गद्दारांचा बिमोड करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आजच्या निकालामुळे आमच्या सारख्या शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात यापेक्षाही पेटून उठून उद्धवजींच्या पाठीशी उभे राहून बाळासाहेबांच्या वचनाला जागण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमच्याकडे सदस्य संख्या जास्त असताना, जास्तीत जास्त प्रतिज्ञा पत्र असताना देखील आजचा निर्णय अनपेक्षित होता. या निर्णयामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.