केंद्रीयमंत्री राणेंच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या कृतज्ञता स्नेहमेळावा
इमारतीची दुरावस्था ; मूलभूत सोयी सुविधांपासून विद्यार्थी वंचित असल्याची माजी विद्यार्थ्यांची खंत
पालकत्वाच्या भूमिकेतून ना. नारायण राणेंच्या माध्यमातून शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन माजी विदयार्थी संघाच्या वतीने उद्या शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते १.३० वा. शासकीय तंत्रनिकेतन मध्ये माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २००२ मध्ये ना. राणेनी कुंभारमाठ – देवलीच्या माळरानावर शासकीय तंत्रानिकेतनची मुहूर्तमेढ रोवली. मात्र आज या इमारतीची दुरावस्था झाली असून विद्यार्थी वर्ग अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी विद्यार्थी संघाने पुढाकार घेतला आहे. पालकत्वाच्या भूमिकेतून ना. राणेंच्या माध्यमातून शासनकर्त्यांचे येथील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. माजी विद्यार्थी संघाने इमारतीच्या दुरावस्थेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा निर्णय घेतला असून ज्या संस्थेत आम्ही शिकलो, घडलो, त्या संस्थेला गत वैभव मिळवून देण्यासाठी शासन आणि माजी विद्यार्थी यांच्या सहयोगाने काम करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष संतोष कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. चिवला बीच येथील किल्ला रिसॉर्ट मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे सचिव ललित वंजारे, गणेश केळूसकर आदी उपस्थित होते. यावेळी संतोष कदम म्हणाले, मालवण शहरातील कुडाळकर हायस्कूल मध्ये १९८५-८६ च्या दरम्याने शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना जागेची अडचण भेडसावत होती. काही कालावधीनंतर वायरी येथील गाड यांच्या जागेत विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल सुरू करण्यात आले. परंतु विद्यार्थी वर्गाची होणारी हेळसांड लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी कुंभारमाठ देवलीच्याा माळरानावर विस्तीर्ण जागेत शासकीय तंत्रनिकेतनची स्वतःची इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये ही प्रशस्त इमारत उभी राहिली. त्यानंतर आजपर्यंत २३ वर्षात या इमारतीची दुरावस्था झाली आहे. कॉलेजची मुख्य इमारत, विद्यार्थ्यांची वस्तीगृहे यांची परिस्थिती बिकट झाली असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे श्री. कदम यांनी सांगून या इमारतीच्या दुरुस्तीचे साधारण अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. एवढी रक्कम उभी करणे माजी विद्यार्थ्यांना अशक्य असल्याने यासाठी शासनकर्त्यांची मदत घेतली जाणार आहे. मालवणचे शासकीय तंत्रनिकेतन उभे करण्यात नारायण राणे यांचा फार मोठा वाटा आहे. भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रात ते महत्त्वाच्याा पदावर असून राज्यातही आज शिंदे – भाजपा सरकार सत्तेत आहे. त्यामुळे राणेंच्या माध्यमातून राज्यकर्त्यांचे या इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधणे आणि या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना एकसंघ करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शनिवारी शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ना. राणेंच्या हस्ते माजी विदयार्थी संघाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या स्नेह मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत खोबरेकर, सचिव ललित वंजारे आणि प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.