१९ फेब्रुवारीला किल्ले सिंधुदुर्गवर निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव सोहळा
बाईक रॅली, ढोल ताशांच्या गजरासह छत्रपतींच्या जयघोषाचा होणार गजर
शिवराजेश्वर माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार पूजन
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवार १९ फेब्रुवारी रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शहरातून शिवरायांचा जयघोष करीत मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.
१९ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता भाजप पदाधिकारी व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत मोरयाचा धोंडा येथे पूजन होणार आहे. त्यानंतर कुंभारमाठ येथे शिवपुतळ्याचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात बाजारपेठ मार्गे बंदरजेटी अशी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तर बंदर जेटी येथे ढोल ताशांचा गजर होणार आहे. त्याच गजरात किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवप्रेमी व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल होणार आहेत. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणाऱ्या या सोहळ्यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, सरचिटणीस निषय पालेकर, राकेश सावंत यांनी केले आहे.