देवबाग रस्ता कामात विरोधकांकडून केवळ राजकारण ; शिवसेनेकडून प्रत्यक्षात कामाला सुरुवात !
हरी खोबरेकर ; देवबाग मध्ये ५० लाख खर्चून रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ
मालवण | कुणाल मांजरेकर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या सुमारे ५० लाख रुपये खर्चाच्या देवबाग येथील रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. देवबाग येथील रस्त्याच्या कामासंदर्भात विरोधकांनी केवळ राजकारण करण्याचे काम केले. मात्र आम्ही प्रत्यक्षात त्या कामास सुरुवात करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठबळामुळेच आपण देवबाग जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लावू शकलो. पर्यटन गाव असलेल्या या गावातील समस्या येत्या काळात आमच्या पक्षाच्या माध्यमातून सरपंच, नवनिर्वाचित सदस्य यांना विश्वासात घेऊन मार्गी लावू अशी ग्वाही हरी खोबरेकर यांनी यावेळी दिली.
यावेळी रमेश कद्रेकर, भाऊ गोवेकर, मनोज चोपडेकर, योगेश सारंग, दादबा राऊळ, गणपत राऊळ, रिलेश फर्नांडिस, फिलसू फर्नांडिस, दत्ता चोपडेकर, मोरेश्वर धुरी, वैभव खोबरेकर, हेमंत चिंदरकर, अक्षय भोसले, ठेकेदार बाबा सावंत, दत्ता पोइपकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. खोबरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसआर मधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी मंजूर केला होता. या कामाला सध्याच्या शासनाने स्थगिती दिली होती. मात्र आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाची निविदा प्रक्रिया झाली. यापूर्वी चार वेळा या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र हे काम करण्यास कोणीही ठेकेदार पुढे आला नाही. आता नवीन ठेकेदारामार्फत या रस्त्याचे काम होणार आहे. सुमारे आठशे मीटर रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण तसेच कारपेट तसेच या मार्गावरील अन्य किरकोळ खड्डेमय रस्त्याचे असे सुमारे ११०० मीटरचे काम केले जाणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही विरोधकांनी राजकारण करण्याचे काम केले. यावेळी आम्ही या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असून पावसाळी हंगाम संपताच हे काम मार्गी लावले जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून या रस्त्याचे काम सुरू होत आहे. विरोधकांनी येथे येऊन केवळ राजकारण करण्याचे काम केले. याउलट आम्ही प्रत्यक्ष काम करून त्यातून प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावे. आम्ही त्याच ताकदीने विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.