ग्रामसेवकाने केलेल्या अपहारामुळे ग्रा. पं. च्या तिजोरीत खडखडाट !

तत्कालिक ग्रामसेवकाने केलेल्या अपहाराचा अहवाल द्या ; बांदिवडे बुद्रुक ग्रा. पं. च्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांची पंचायत समितीत धडक

मालवण : मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे तत्कालीन ग्रामसेवक एच. बी. तांबे यांना अपहार प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तरी त्यांनी केलेल्या अपहाराचा अहवाल मिळावा, अशी मागणी बांदिवडे बुद्रुक सरपंच आशु मयेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून मालवण गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीत झालेल्या लाखोंच्या अपहार प्रकरणामुळे ग्रामपंचायत तिजोरीत खडखडाट झाल्याचे चित्र आहे. तरी याबाबत योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी. अन्यथा आम्हाला उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर, सदस्य नारायण परब व ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी यांना दिला आहे.

सोमवारी बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विभाग प्रमुख समीर लब्दे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संबंधीत निलंबित ग्रामसेवक यांची प्रशासकीय विभागामार्फत चौकशी सुरू आहे. ग्रामपंचायत मागणीनुसार याबाबत वरिष्ठ स्तरावर कारवाई बाबत पत्रव्यवहार केला जाईल. असे पंचायत समिती प्रशासनाने सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!