कांदळगावच्या श्री देव रामेश्वराची स्वारी किल्ले सिंधुदुर्गच्या भेटीवर !
मालवण शहरात व्यापारी वर्गासह सर्वपक्षीय नागरिकांनी केलं उत्स्फूर्त स्वागत
अवी नेरकर कुटुंबीय, भाजपासह शहरवासियांकडून ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहाराचे वाटप
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवकालीन वारसा लाभलेले कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर शुक्रवारी सकाळी किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवरायांच्या त्रैवार्षिक भेटीसाठी आपल्या लवाजाम्यासह वाजत गाजत रवाना झाले आहेत. रामेश्वराच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गुढ्या, तोरणे, सडा रांगोळी काढून रस्ते सजवण्यात आले आहेत. दुपार नंतर रामेश्वराची स्वारी होडीने किल्ले सिंधुदुर्गवर दाखल होऊन आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांची भेट घेणार आहे. दोन दिवस हा सोहळा रंगणार आहे. दरम्यान, मालवणच्या सीमेवर कोळंब सागरी महामार्गावर व्यापारी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रामेश्वराच्या पालखीचे स्वागत केले. भाजपच्या वतीने याठिकाणी भाविकांसाठी कोकम सरबत, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. तर कोळंब येथे अवी नेरकर आणि कुटुंबियांनी भाविकांसाठी लाडू आणि सरबत वाटप केले. ठिकठिकाणी अन्य नागरिक आणि लोकप्रतिनिधिनी देखील भाविकांसाठी थंडपेय आणि अल्पोपहार उपलब्ध करून दिला होता.
सकाळी ९ वाजता देव रामेश्वर यांचे आपल्या वारेसुत्र, तरंग व रयतेसह मालवणला प्रयाण झाले, मार्गात सर्वत्र स्वागत करण्यात येत होते. दुपारी जोशीमांड मेढा, मालवण येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर येथे भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. दुपार नंतर रामेश्वराची पालखी समुद्रमार्गे किल्ले सिंधुदुर्ग येथे देव रामेश्वर, शिवाजी महाराज व आदिमाया भवानी माता यांच्या भेटीसाठी निघणार आहे. तर सायंकाळी ४ नंतर देव दांडेश्वर मंदिर, दांडी येथे आगमन, रात्री मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे मुक्काम, ११ रोजी सकाळी ८ नंतर कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वचन, सकाळी १० नंतर रामेश्वर मांड, बाजारपेठ येथे आगमन, दुपारी १२ नंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ४ वाजता रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे प्रयाण असा कार्यक्रम होणार आहे.
श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी कुटुंबिय यांच्याकडून स्वागत केले जाते. त्यानंतर छत्रपतींकडून श्री देव रामेश्वराला नजराणा दिला जातो. याप्रसंगी सर्व वारेसुत्रांचाही सन्मान होतो. देव रामेश्वर आपल्यावतीने छत्रपतींना सन्मानित करतात. नंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र व भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद आदान-प्रदान करतात. याची देही याची डोळा पहावा असाच हा सोहळा ठरतो. यंदाही भाविक रयतेला किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, मालवण, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, मालवण, रामचंद्र महादेव आचरेकर व दांडी गाव यांच्यावतीने सोय करण्यात येणार आहे. तरी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ कांदळगाव अध्यक्ष उदय लक्ष्मण राणे, सचिव संतोष नारायण परब देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.