कालावल, कर्ली खाडीपात्रातवाळू उत्खननाला अखेर हिरवा कंदील !
वाळू उत्खनन, वाहतूक पास प्रशासनाकडून वितरित ; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती
मालवण : मालवण तालुक्यातील कर्ली व कालावल खाडी पात्रातील वाळू पट्ट्यांचे लिलाव झालेल्या तीन ठिकाणी वाळू उत्खननास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. वाळू उत्खनन व वाहतूक पासचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बुधवारी दिली आहे.
दरम्यान, अधिकृत वाळू उत्खनन सुरू झाले असताना अनधिकृत वाळू उत्खनन ज्या ठिकाणी सुरू असेल त्यावर तसेच विना पास अनधिकृत वाळू वाहतूक डंपर व अन्य वाहने यावरही कारवाई सुरूच राहणार आहे. अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. ज्या वाळू पट्ट्यांचे लिलाव झाले आहेत. त्या लिलाव धारकांकडून पैसे भरणा व अन्य अटी शर्तींची पूर्तता झाल्यानंतर त्यांना वाळू उत्खनन परवानगी व पास देण्यात आले आहेत. यात मालवण तालुक्यातील कालावल खाडीतील सी १ हुरास याठिकाणी तर कर्ली खाडीत देवली डी ४ याठिकाणी तसेच कुडाळ हद्दीत एका ठिकाणी वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली असून वाळू उत्खनन सुरू झाले आहे.