आंगणेवाडी यात्रेत सिंधुदुर्ग पोलिसांचं चोख नियोजन ; आयजींकडून कौतुक !
लाखोंच्या गर्दीतही चोरी, पाकिटमारी नाही ; पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप
मालवण : यंदाच्या आंगणेवाडी यात्रेत अपेक्षेप्रमाणे लाखोंची गर्दी उसळली. या गर्दीत सिंधुदुर्ग पोलिसांचं चोख नियोजन पाहायला मिळालं. यावर्षी यात्रेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा व्हीव्हीआयपी नेत्यांची उपस्थिती असल्याने पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताचा कमालीचा ताण होता. असे असतानाही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने गर्दी नियंत्रणा बरोबरच यात्रेत कोणताही अनुचित प्रकार, चोरी, पाकीटमारी असे प्रकारही घडले नाहीत. त्यामुळे चोख नियोजन करून दिवसरात्र सेवा बजावणाऱ्या सिंधुदुर्ग पोलीस दलाचे सर्वांनी कौतुक केले. कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनीही सिंधुदुर्ग पोलीस दलाचे कौतुक केले आहे. तसेच मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप दिली आहे.
आंगणेवाडी यात्रोत्सवास यावर्षी अपेक्षेप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. पहिल्यांदाच दोन दिवस यात्रोत्सवास सुरू होता. त्यामुळे लाखोंच्या जनसमुदायात यात्रा संपन्न झाली. दोन वर्षे कोरोना निर्बंधा नंतर यावर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवात मोठी गर्दी होणार या अपेक्षेने आंगणेवाडी मंडळ, जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांनी यात्रा नियोजन केले. यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदी व्हीव्हीआयपी मंडळी अन्य नेतेमंडळी यांचीही उपस्थिती होती. यात्रेपासून काही अंतरावर भाजपचा मेळावा संपन्न झाला. एकूणच आंगणेवाडी यात्रोत्सव यावर्षी महाइव्हेंट ठरला. मात्र यात्रा यशस्वीतेसाठी या सर्वाचे नियोजन पोलीस प्रशासनाने आंगणे ग्रामस्थांच्या सहकार्याने सुयोग्य पद्धतीने केले.
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड अशी ४०० जणांची टीम आंगणेवाडी यात्रोत्सवात सेवेत होती. स्थानिक पोलीस ठाणे मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव व सर्व टीम, सर्व अधिकारी यांच्या एकत्रित सेवेतून यात्रा यशस्वी पार पडली. नेते मंडळी, भाविक अनेकांनी पोलीस प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनाचे विशेष कौतुक केले.