“कागदी घोडे नाचवणे, आणि स्वतःची प्रसिद्धी” हीच मुख्याधिकाऱ्यांची कार्यक्षमता !
कर्मचारी वसाहतीतील “त्या” दुर्घटनेनंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची टीका
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील बांगीवाडा येथील पालिका कर्मचारी वसाहती नजिकच्या दुर्घटनेनंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडलं आहे. मुख्याधिकारी यांचा कारभार म्हणजे कागदी घोडे नाचवणे, स्वतःची प्रसिद्धी करणे याच प्रकाराने सुरू आहे. बांगीवाडा येथे नगरपरिषदेच्या वतीने आर्थिक दुर्लभ घटक योजनेअंतर्गत इमारत बांधकाम सुरू आहे. बाजूला स्वच्छता कर्मचारी वसाहत आहे. मात्र या कामाकडे पालिका प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. त्याचाच परिणाम म्हणून इमारत बांधकाम सुरू असताना दोन फूट लांबीचा एक लोखंडी रॉड कर्मचारी वसाहत येथील पाच वर्षीय मुलाच्या अंगावर पडून मुलगा जखमी झाला आहे. आपल्या कर्मचारी वर्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला मुख्याधिकारी यांना वेळ नसेल तर प्रशासक म्हणून शहराचा कारभार काय करणार ? असा सवाल श्री. कांदळगांवकर यांनी करीत मुख्याधिकाऱ्यांवर यांच्यावर थेट निशाणा साधला.
बांधकाम इमारतीवरील लोखंडी रॉड पडून सफाई कर्मचारी कुटुंबातील मुलगा जखमी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी सफाई कर्मचारी कुटुंबियांची भेट घेतली. मात्र एवढा अपघात होऊनही पालिका प्रशासन आपल्याच कारभारात दंग आहे. अपघात ठिकाणी कोणी अधिकारीही फिरकले नाहीत. असे सांगत कांदळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इमारत बांधकाम करणाऱ्या ठेकेदार एजन्सीला फैलावर घेत सुरक्षा उपाययोजना करूनच पुढील काम सुरू करा. कर्मचारी कुटुंबीय यांना कोणताही त्रास यापुढे होता नये. त्या दृष्टीने काम करा. असा सज्जड दम महेश कांदळगावकर व यतीन खोत यांनी दिला. यावेळी सफाई कर्मचारी कुटुंबीय तसेच युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, युवती सेना पदाधिकारी शिल्पा खोत उपस्थित होते.