आंगणेवाडी यात्रेतून मालवण एसटी आगारास ७.२५ लाखांचे उत्पन्न
२७ हजार ३२१ प्रवाशांनी घेतला लाभ ; आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती
मालवण : आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा मार्गावर रा. प. मालवण आगारातून ४५ एसटी बसच्या माध्यमातून विविध गावातून दोन दिवस सतत फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यातून मालवण आगारास ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.
जादा वाहतूकीच्या माध्यमातून मालवण आगाराकडून १२ हजार १७८ किमी चालवून त्यातून ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले. ५९.५४ पैसे प्रतिकिमी उत्पन्न व ९३.३६ एवढे भारमान मिळाले. विभाग नियंत्रक प्रशांत वासकर व विभागिय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीरीत्या जादा गाड्या व फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात्रा कालावधीत कोणतीही रा. प. बस मार्गस्थ बिघाड न झाल्याने यांत्रिक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यात्रा मार्गावर २७ हजार ३२१ भाविक प्रवाश्यानी एसटी बस वाहतूकीचा लाभ घेतला. त्याबद्दल आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी आभार मानले आहेत.