राक्षसी वृत्तीचा बिमोड आई भराडी कडून सहा महिन्यांपूर्वीच ; भाजपचा टोला
जिल्ह्याच्या विकासात मांजरी सारखे आडवे येऊ नका : धोंडू चिंदरकर यांचा सल्ला
वाहतूक कोंडीमुळे भाविकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त
मालवण | कुणाल मांजरेकर
आंगणेवाडी येथील भाजपच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आई भराडी राक्षसी वृत्तीचा बिमोड करेल असे वक्तव्य श्री. खोबरेकर यांनी केले आहे. परंतु, आईने सहा महिन्यांपूर्वीच राज्यात उन्माद घातलेल्या राक्षसी वृत्तीचा बिमोड केला आहे. फक्त तुम्हाला ते समजून घेता येत नाहीय, असा टोला लगावतानाच आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग बदलतोय. जिल्ह्यात विकासाची कामे होत आहेत. याचेच दुखणे ठाकरे गटाला असून जिल्ह्याच्या विकासात मांजरी सारखे आडवे येऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे की, राक्षसी वृत्तीचा बिमोड आई भराडीने केलेलाच आहे. फक्त ते तुम्हाला अजुन समजून घेता येत नाही. आई भराडी देवीच्या यात्रेत काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, नाकरता येत नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. दरवर्षी देवीच्या मंडपात बसून खोटी आश्वासाने देऊन सिंधुदुर्गाच्या जनतेला गाजर देऊन आमदार खासदार आणि मंत्री आणि राक्षसी वृत्तीचे सुडाचे राजकारण केल्याचं फळ म्हणून या वेळेस देवीने तुमची सत्ता उखडून टाकली. कारण आई भराडीच्या सभामंडपात येऊन जास्त काळ खोट पचत नाही. आज पालकमंत्री महोदयानी रस्ते बघा कसे चकचकित करून घेतले. स्वतः माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी त्याचा पाठूपुरावा केला. आज “सिंधुदुर्ग बदलतोय सिंधुदुर्ग स्थिरवतोय” याचं ठाकरे गटाला दुखणं आहे. सेनेवाल्यानी जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने खुप मागे नेले आहे. त्यामुळे आता त्यांनी मानसिकता बदलावी, काम करणाऱ्यांना काम करु द्यावे. जिल्ह्याला सक्षम पालकमंत्री आणि केंद्रीयमंत्री लाभले आहेत. त्यामुळे मांजरी सारखे सिंधुदुर्गच्या विकासाच्या आड येऊ नका. या जिल्ह्यात आता निश्चित अमूलाग्र बदल दिसेल थोडं सबुरीने घ्या. आता फक्त मालवण कुडाळच्या आमदारांचं आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या खासदारांचं काय होणार ते बघा. पर्यायी मार्ग शोधा, बाकी भराडी मातेने व्यवस्थित निर्गत लावली असून उरली सुरली येणाऱ्या वर्षभरात लागेल, असे सांगून भाविकांना झालेल्या त्रासाबद्दल धोंडू चिंदरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.