बांधकाम ठेकेदाराचा अक्षम्य हलगर्जीपणा ; लोखंडी रॉड अंगावर पडून ५ वर्षीय मुलगा जखमी
मालवण नगरपरिषद वसाहत येथील घटना ; कर्मचारी कुटुंबीय संतप्त
मालवण : शहरात बांगीवाडा येथील पालिका कर्मचारी वसाहती नजिक नगरपरिषदेच्या वतीने आर्थिक दुर्लभ घटक योजनेअंतर्गत तीन मजली इमारत बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना दोन फूट लांबीचा एक लोखंडी रॉड कर्मचारी वसाहत येथील नावीन्य मेस्त्री या पाच वर्षीय मुलाच्या अंगावर पडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेनंतर कर्मचारी वसाहतीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. हा रॉड डोक्यात पडला असता तर मोठी दुखापत झाली असती. याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल कर्मचारी कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान यापूर्वीही अश्या घटना घडल्या असून इमारत बांधकाम ठिकाणी ठेकेदार एजन्सी मार्फत कोणतीही उपयोजना करण्यात आली नसल्याचे कर्मचारी कुटुंबीय यांनी सांगितले आहे. सुरक्षा उपयोजना करा असे सांगूनही कोणत्याही उपयोजना केल्या जात नाहीत. बांधकाम कामगार उडवाउडवीची उत्तरे देतात. सुरक्षा उपाययोजना नसल्याने आजची घटना घडली आहे. बांधकाम इमारत बाजूला नगरपरिषद कर्मचारी कुटुंबीय राहत असल्याने इमारत कामाच्या ठिकाणी साहित्य खाली पडू नये यासाठी तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा बांधकाम करू देणार नाही. असा इशारा कर्मचारी कुटुंबीयांनी दिला आहे.