आंगणेवाडीच्या पवित्रभूमीत भाजपाकडून राक्षसी वृत्तीचे दर्शन ; हरी खोबरेकरांची टीका
भाजपचा आनंद मेळावा देवीच्या भक्तांसाठी वेदनादायी आणि कष्टदायी ; अबाल वृद्धांसह भाविकांना दोन कि.मी.ची पायपीट
मालवण | कुणाल मांजरेकर
आंगणेवाडी यात्रेचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने आंगणेवाडी भोगलेवाडीच्या माळरानावर आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी टीका केली आहे. हा मेळावा भाजपासाठी आनंद मेळावा असला तरी जत्रेला येणाऱ्या भाविकांना आणि जनतेला तो वेदनादायी आणि कष्टदायी ठरला. या मेळाव्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या देवीच्या भक्तांना दोन- दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश होता. या मेळाव्यातून जिल्ह्यासाठी ठोस काहीतरी मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करून आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून भाजपने राक्षसी वृत्तीचे दर्शन घडवले. आई भराडीच कोणत्या ना कोणत्या रूपाने या राक्षसी वृत्तीचा बिमोड करील, अशी टीका श्री. खोबरेकर यांनी केली आहे.
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेचे औचित्य साधून भाजपच्या वतीने शनिवारी सायंकाळी या ठिकाणी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर झालेल्या टिकेचा मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी समाचार घेतला आहे. या मेळाव्यात भाजपाच्या नेत्यांची जी भाषणे होत होती त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आपण काय देणार यावर भाष्य होणे अपेक्षित होते. पण या भाषणातून कोकणच्या नेत्यांचा क्रूरपणा दिसून आला. जत्रेला आल्यावर सर्वजण राजकीय पादत्राणे बाहेर ठेवतात, हा इतिहास आहे. परंतु या मेळाव्याचं राजकारण करण्यात आलं. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कसा करता येईल यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु विरोधकांना कसे अडचणीत आणता येईल, याचाच प्रयत्न या ठिकाणी झाला. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांना जाहीर व्यासपीठावरून धमक्या दिल्या गेल्या आणि हे प्रकार गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घडत होते. यावरून भाजपच्या राजवटीत सर्वसामान्य जनता किती सुरक्षित आहे, याचा प्रत्यय दिसून आला. या मेळाव्याला आणलेल्या अतिरिक्त गर्दीमुळे पोलीस प्रशासनावर ताण आला. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यामुळे अनेक जण आंगणेवाडी नजीक येऊन देवीच्या दर्शनापासून वंचित राहिले. स्वतःच्या भक्तांचे झालेले हाल आई भराडी देवी कधीही सहन करणार नाही. या राक्षसी वृत्तीचा भराडी देवी चोख बंदोबस्त करेल, असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.