मालवण पं. स. आढावा सभा : खड्डेमय रस्त्यांमुळे सुनील घाडीगांवकर आक्रमक

शासनाकडून मागील कामांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, तर आम्ही करायचे काय ? सा. बां. अधिकाऱ्यांचा सवाल

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समितीच्या आढावा सभेत खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नांसह तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आक्रमकपणे मांडत भाजपचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, मागील कामांचेच पैसे अद्यापही शासनाकडून मिळाले नाहीत. आम्ही करायचे काय ? अशी स्पष्ट भूमिका सार्वजनिक बांधकाम अधिकारी नितीन दाने यांनी मांडली. यावरून घाडीगांवकर अधिकच आक्रमक बनले. जर राज्य शासनाकडे पैसेच नसतील जनतेची कामे होणारच नसतील तर उपयोगच काय ? गणेश चतुर्थी जवळ आली मात्र रस्त्यावरील खड्डे बुजबण्यात आले नाहीत. झाडे कटाईही पूर्ण झाली नाही. प्रशासनाकडून दोनच उत्तरे मिळतात. एकतर पैसा नाही आणि दुसरे कर्मचारी नाहीत. शासन प्रशासनाच्या या कारभारात जनतेने करायचे काय ? असा सवाल घाडीगांवकर यांनी उपस्थित केला.

   

मालवण पंचायत समितीची आढावा बैठक सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण पंचायत समिती सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटनेते सुनिल घाडीगावकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सदस्य अशोक बागवे, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर यासह विविध खात्याचे प्रमुख उपस्थितीत होते. १५ व्या वित्त आयोग मधून झालेल्या कामांचे पैसे कामे पूर्ण केलेल्याना अद्याप मिळाले नाहीत. ऑनलाईन गोंधळात हे पैसे उपलब्ध होऊनही दिसत नाहीत. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी सुनील घाडीगांवकर यांनी केली. याबाबत सभापती अजिंक्य पाताडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उपसभापती राजू परुळेकर यांनीही चर्चेत सहभागी होत नव्या ऑनलाईन निकषामुळे झालेल्या अडचणी दुरु करण्याची भूमिका मांडली. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

रेवंडी, कांदळगाव खड्डेमय रस्ते प्रश्न, रेवंडी खाडी पात्रातील अनधिकृत भराव प्रश्न याबाबत वारंवार प्रश्न मांडूनही कार्यवाही होत नसल्याबाबत सदस्य सोनाली घाडीगांवकर आक्रमक बनल्या. येत्या दोन दिवसात खड्डे बुजवा, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. दरम्यान, सदस्य निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, अशोक बागवे यांनीही मतदार संघातील समस्या मांडल्या. वडाचापाट ग्रामपंचायत इमारत, हिवाळे येथील ग्रामसेवकांचे शासकीय निवासस्थान इमारत, या विषयावरून सुनील घाडीगांवकर यांनी प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. योग्य कार्यवाही होत नाही तोपर्यंत सभागृहात प्रश्न उपस्थित करत राहणार असल्याचे घाडीगांवकर यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!