शिवसेनेतील “त्या” प्रवेशाचाही भाजपकडून भांडाफोड !

शिवसेनेत प्रवेश केलेले “ते” सरपंचही शिवसेनेचेच : भाजपा विभाग अध्यक्षांची माहिती

कुणाल मांजरेकर

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर शिवसेना – भाजप मध्ये सुरू असलेला कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. चार दिवसांपूर्वी देवगड मधील भाजपच्या दोघा नगरसेवकांच्या कथित शिवसेना प्रवेशानंतर भाजपने या नगरसेवकांनी जनआशीर्वाद यात्रेपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्याचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर आता मालवण तालुक्यातील आडवली – मालडी विभागातील असगणी सरपंचाच्या शिवसेना प्रवेशाला देखील भाजपने हरकत घेतली आहे. हा सरपंच पूर्वीपासूनच शिवसेनेचाच असून आमदार वैभव नाईक हे वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपल्याच कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे देखावे करीत असल्याचा आरोप भाजपचे विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

   असगणी सरपंच हेमंत पारकर यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आडवली - मालडी विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता. आचरा येथे मंत्री नारायण राणे यांच्या स्वागताला आडवली-मालडी मतदार संघातून भाजपची निघालेली भव्य रॅली पाहता आमदार वैभव नाईक, शिवसेना विचलित झाली. त्यामुळे या मतदार संघात आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न करताना आपल्याच पक्षातील असगणी सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश घेतल्याचा दिखावा आमदार नाईक यांनी केला आहे. हेमंत पारकर हे निवडून आल्यापासून शिवसेनेतच होते. अनेक कार्यक्रमात ते शिवसेने सोबत होते. आमदार वैभव नाईक यांच्या सोबत जून महिन्यात हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिवसेनेच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अशा स्थितीत केवळ राजकारण करण्यासाठी पक्ष प्रवेशाचा दिखावा शिवसेना व आमदार वैभव नाईक करत आहेत. 


आडवली मालडी मतदारसंघ नेहमीच राणे साहेबांचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजप नेते दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात राणे साहेबाना नेहमीच लीड मिळाले. यामुळेच या मतदारसंघात शिरकाव करण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत.शिवसेनेला केवळ राजकारण करायचे असेल मात्र आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. जनतेसोबत राहून विकासकामे करायची आहेत. त्यामुळे यापुढेही आडवली - मालडी मतदार संघात भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास प्रशांत परब यांनी व्यक्त केला.
प्रशांत परब – आडवली मालडी विभागीय अध्यक्ष, भाजपा
हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका कार्यक्रमातील बातमी पुराव्या दाखल प्रशांत परब यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!