मळगाव सुतारवाडी सर्कलवर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

झाराप पत्रादेवी बायपास देखील बनू लागलाय मृत्यूचा सापळा.!

सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावर झाराप – पत्रादेवी बायपासदेखील अलीकडेच मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. जिल्ह्यातील कणकवली गडनदी हळवल फाट्याप्रमाणे आता झाराप – पत्रादेवी बायपासवर देखील अलीकडेच मोठं मोठे अपघात झाले आणि त्या अपघातांमध्ये अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. हायवेला गतिरोधक नको हे नियम या अपघातांना कारणीभूत ठरत असल्याच्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत.

मळगाव सुतारवाडी सर्कलवर कारच्या जोरदार धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा बळीराम गवस ( ३५, रा. मळगांव मूळ रा. सासोली हेदूसवाडी दोडामार्ग) असे त्याचे नाव आहे. मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. अपघातात तो जागीच कोसळला व गंभीर इजा झाली. स्थानिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेला पाचरणे केले मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. कार चालक राहील जहिर दादला ( अंधेरी मुंबई ) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, उपनिरीक्षक अमित गोते, हे. कॉ. डी.व्ही. नाईक यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

कृष्णा गवस हे शिक्षक होते. मूळ दोडामार्ग येथील असलेल्या गवस यांनी काही वर्षांपूर्वीच मळगाव येथे घर बांधले होते. कुडाळ वरून मळगाव च्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या कारची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून पंचनामा सुरू आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!