हळवल फाट्यावर अपघाताचे सत्र सुरूच ; लक्झरी बस उलटून दोघांचा मृत्यू
६ जण गंभीर जखमी ; उर्वरित २७ जणांवर उपचार सुरू
कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली शहरा लगत असणाऱ्या हळवल फाट्यावर आज गुरुवारी पहाटे ५:३० वा च्या सुमारास मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी (ए आर १६ ए ७२७७) पलटी होऊन यातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. तर उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुमारे ४० प्रवासी या गाडीतून प्रवास करत असल्याचे समजते. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने एकच हलकल्लोळ झाला. हळवल फाट्यावरील अवघड वळणावर ही लक्झरी पलटी झाली. वारंवार हे वळण धोकादायक बनत चालले असून अनेकांनी प्राण देखील गमावले असून हायवे प्रशासन व सोपस्कारी यंत्रणेचे मात्र डोळे केव्हा उघडणार असे प्रश्न वारंवार तेथील नागरिक उपस्थित करत आहेत.
अपघाताची माहिती मिळतात कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. अभिजीत आपटे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, किरण कदम, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, वृषाली बरगे, श्री. पार्सेकर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी घेतली. अपघातातील काहींना कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात तर उर्वरित जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचे हात, पाय फ्रँक्चर झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. हे धोकादायक वळण वारंवार अपघातास निमंत्रण देत असून महामार्ग चौपदरीकरण कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कामामुळे या अपघातग्रस्त वळणावर सातत्याने गेले काही वर्षे अपघात सुरू आहेत. एवढे अपघात होऊन देखील ठेकेदार कंपनीचे डोळे केव्हा उघडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी गटनेते संजय कामतेकर यांच्याशी संपर्क साधत कलंडलेली लक्झरी उभी करण्याकरिता जेसीबी पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार ठेकेदार अनिल पवार, जावेद शेख हे जेसीबी घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने ही लक्झरी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. उपजिल्हा रुग्णालयात देखील पाहणी केली असता त्या ठिकाणी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. तर २ जणांचा मृत्यू देखील झाला होता ६ जण गंभीर जखमी तर २७ जणांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणेची देखील मोठी धावपळ पाहायला मिळाली.