शिक्षकाचे बस प्रवासात निधन ; फोंडाघाट येथील घटना

कणकवली : मयूर ठाकूर सरमळे ता. सावंतवाडी येथील देऊळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हरिभाऊ रामभाऊ घोगरे (वय ५३) यांचे प्रवासा दरम्यान कदंबा बस मध्ये हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हा प्रकार आज दुपारी कणकवली फोंडाघाट प्रवासा दरम्‍यान घडला. ते आपल्या परभणी जिल्ह्यातील कान्हा या गावी गेले होते. तेथून परतत असताना वाटेतच त्यांची प्रकृती खालावली. परंतू उपचारापुर्वीच त्यांचे निधन झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की,हरिभाऊ घोगरे सरमळे शाळेत तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी डेगवे-मोयझर शाळेत त्यांनी सेवा बजावली. सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी घेऊन ते शनिवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कान्हा या आपल्या गावी गेले होते. आपल्या गावाकडून ते मंगळवारी रात्री कोल्हापूरपर्यंत आल्यानंतर ते बुधवारी सकाळी मिरज-पणजी या कदंबा गाडीने येत होते. ही बस फोंड्यादरम्यान आली असता हरिभाऊ घोगरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तात्काळ त्यांना फोंडा प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी श्री शेर्लेकर, विस्तार अधिकारी सौ दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख श्रद्धा महाले, शिक्षक संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष म. ल. देसाई, प्राथमिक शिक्षक संघांचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांच्यासह त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तात्काळ फोंडा येथे धाव घेतली. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेने त्यांच्या गावी नेण्यात आले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील भाऊ, बहीण असा परिवार आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!