देवली सड्यावर महसूलचा “डबल धमाका” ; गोव्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत अनधिकृत वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले !
वाळूसाठी आणलेले २८ डंपर ताब्यात ; तर दुसरीकडे लपवून ठेवलेला ८० ब्रास वाळू साठा सील
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू व्यवसायावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे. देवली सड्यावर लपवून ठेवलेला अनधिकृत वाळूचा साठा नेण्यासाठी आलेले २८ डंपर महसूल विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले आहेत. यामध्ये गोव्यासह सिंधुदुर्गातील डंपरचा समावेश असून या कारवाईमुळे गोव्यापासून सिंधुदुर्गातील अनधिकृत वाळू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, याच परिसरात लपवून ठेवलेला आणखी ८० ब्रास वाळू साठा देखील महसूल विभागाच्या हाती लागला आहे. पोलिसांच्या सहकार्याने मध्यरात्री २ वाजल्यापासून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, महसूलच्या गाड्या दिसताच ८ ते १० डंपरनी आतील वाळू साठा जमिनीवर ओतला आहे. दुपारी उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक एस ए भोसले (ओरोस), मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, पीएसआय झांजुरणे यासह महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली.
सागरी महामार्गावरून आतील कच्च्या रस्त्यावर देवली सडा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. २८ डंपर व डंप केलेला वाळू साठा महसूलने ताब्यात घेतला आहे. डंपर ड्रायव्हर पळून गेले आहेत. मार्गावर अनेक ठिकाणी वाळू डंप केलेली दिसून आली आहे. सर्वांचे पंचनामे सुरू होते. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. ज्या डंपर मध्ये वाळू साठा भरून होता ते डंपर मालवण तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई सुरू होती. तर उर्वरित डंपर व डंप वाळू साठा यांचा पंचनामा सुरू होता. डंपर मध्ये वाळू भरण्यासाठी असलेला एक जेसीबी पळून गेला, त्याचीही माहिती घेण्याची काम सुरू होती. असेही महसूल पथकाने सांगितले. या कारवाईत मोठ्या संख्येने महसूल आणि पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.