जीएसटी खात्याच्या नोकरशहांची मनमानी ; करभरणा केलेल्या व्यापाऱ्यांनाही वेठीस धरण्याचे प्रकार

जिल्हा व्यापारी महासंघ आक्रमक ; जीएसटी पीडित व्यापारी आणि त्यांच्या कर सल्लागारांची शुक्रवारी कुडाळात सभा

मालवण | कुणाल मांजरेकर

केंद्र व राज्य सरकारच्या जिएसटी(वस्तू व सेवा कर) खात्याच्या काही नोकरशहांची जिल्ह्यात मनमानी सुरु झाली आहे. जिएसटी कायद्यातील कलम १६ (४) मधील तरतुदींचा गैर अर्थ लावीत त्यांनी व्यापाऱ्यांना वेठीस धरल्याच्या अनेक तक्रारी महासंघाकडे प्राप्त झाल्या आहेत. जीएसटी कर भरूनही व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असून या विरोधात व्यापारी महासंघाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. प्रामाणिकपणे धंदा करून सरकारला करभरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना देशोधडीला लावण्याचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी अशा सर्व प्रकरणांची संपुर्ण माहिती संकलित करून पुढील आवश्यक त्या कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यासाठी व्यापारी महासंघ व जिएसटी टॅक्स प्रॅक्टिशनर्स असो. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जिएसटी पिडीत व्यापारी व त्यांचे करसल्लागार यांची सभा शुक्रवारी १३ जानेवारी रोजी सायं. ३.३० वा. सामाईक सुविधा केंद्र एमआयडीसी कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांनी आपल्या वाट्याचा संपुर्ण कर भरूनही परतावा (रिटर्न) दाखल करण्यास किरकोळ विलंब झाल्याचे कारण देत लाखो रूपयांच्या करपरताव्याची मागणी नाकारली जात आहे. कर भरलेला असूनही पुन्हा विलंब आकार, दंड आदींसह करभरणा करण्याच्या नोटीसाही संबंधीतांस पाठवल्या जात आहेत. याही पुढे जात खात्याकडून संबंधीत व्यापाऱ्याची बॅंक खाती गोठविणे, स्थावर मालमत्तेवर बोजा चढविणे असे प्रकारही सुरू आहेत. हे कमी की काय म्हणून यावर न थांबता नसलेली थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधीत घाऊक व्यापाऱ्याच्या कडून माल खरेदी करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना सदरच्या घाऊक व्यापाऱ्याच्या बिलाच्या रकमा न देता त्या कर खात्याकडे जमा करण्याच्या
धमकी वजा सुचनाही जिएसटी खात्या मार्फत दिल्या जात असल्याची बाब महासंघाच्या ११ जानेवारी रोजी वेंगुर्ले येथे झालेल्या बैठकीत समोर आली आहे. त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व संबंधितांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर व सागर तेली यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!