१८ महिन्यांची मुदत असलेल्या पूलाचे काम ४ वर्षानंतरही ठप्प; वराड, सोनवडे ग्रामस्थ आक्रमक !
२६ जानेवारी पूर्वी काम सुरु न झाल्यास प्रजासत्ताक दिनी नदीपात्रात उपोषण करण्याचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
मोठा गाजावाजा करीत चार वर्षांपूर्वी भूमिपूजन केलेल्या वराड सोनवडेपार या पुलाचे काम अद्याप पर्यंत रखडले आहे. या कामाची मुदत १८ महिन्यांची असताना सद्य स्थितीत हे काम बंद असल्याचे निदर्शनास आल्याने वराड आणि सोनवडे गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. २६ जानेवारी पर्यंत हे काम सुरु न झाल्यास प्रजासत्ताक दिनी नदीत उतरून उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थानी दिला आहे.
अनेक काळ रखडलेल्या पुला संदर्भात वराड व सोनवडे गावातील ग्रामस्थांची बैठक रविवारी पार पडली, या पुलाच्या कामाचे भूमीपूजन २०१८ ला झाले होते. २०२० रोजी काम पूर्ण होईल याची ठेकेदाराने तारीख दिली होती. पण आता २०२३ वर्ष चालू झाले तरी हे काम पूर्ण झाले नाही. पुलाचे फक्त ६० % काम पूर्ण झाले आहे. यावेळी ग्रामस्थांनी पुलाच्या कामाची पाहणी केली असता तेथे कोणी एक कामगार निदर्शनात आले नाहीत. तसेच कामाला आवश्यक मटेरियल पण तेथे नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. हे काम २६ जानेवारी पूर्वी सुरु न झाल्यास नदीमध्ये उपोषण करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यावेळी वराड गावच्या सरपंच सौ. शलाका समीर रावले, ग्रामपंचायत सदस्य, वराड ग्रामस्थ तसेच सोनवडे गावचे प्रमोद धुरी, ग्रा. पाम सदस्य, उपसरपंच व सोनवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.