वराड – सोनवडेपार पूलाच्या पूर्णत्वासाठी भाजपा नेते निलेश राणे ऍक्शन मोडमध्ये !
पीएमजीएसवायच्या कार्यकारी अभियंत्यांशी माजी खा. राणे यांनी केली चर्चा
तातडीच्या आढावा बैठकीनंतर दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्याची ठेकेदाराची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील वराड सोनवडेपार पुलाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपा प्रदेश सचिव माजी खा. राणे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. माजी खा. राणे यांनी या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्या संदर्भात सूचनेनंतर पीएमजीएसवायच्या कार्यकारी अभियंत्यांनी आज सोमवारी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ठेकेदाराने ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची डेड लाईन दिली आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला झालेल्या कामाचा आढावा देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता बामणे यांनी ठेकेदाराला दिले आहेत.
गेली कित्येक वर्षे अपूर्ण असलेल्या वराड-सोनवडेपार पुलाच्या कामासंदर्भात निलेश राणे ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. पुलाच्या कामासंदर्भात दर आठवड्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा सुरू आहे. मागील आठवड्यात बंद असलेलं काम सुरू करण्याची सूचना केल्यानंतर काम सुरू करण्यात आले होते. मात्र ठेकेदाराकडून पुन्हा कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा सुरू असल्याची तक्रार स्थानिकांकडून आल्यानंतर निलेश राणे यांनी कार्यकारी अभियंता पंतप्रधान ग्रामीण सडक योजना यांच्याशी संपर्क करून कामाचा आढावा घेतला. यानंतर कार्यकारी अभियंता श्री. बामणे यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करून ठेकेदारांना कडक शब्दात सूचना केल्या. यावर ठेकेदाराने पुलासंदर्भातील सर्व कामे ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले असून काम पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांनी संबंधित ठेकेदार यांना दिले आहेत.