एसीबी चौकशीच्या निमित्ताने आ. वैभव नाईकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न !

हरी खोबरेकर यांचा आरोप ; वैभव नाईक हा शिवसेनेचा बुरुज, हा बुरुज ढासळणार नसल्याचा विश्वास केला व्यक्त

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना आमदार वैभव नाईक हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत नसल्याने एसीबी चौकशीच्या निमित्ताने त्यांना त्रास देण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. मात्र आ. नाईक हे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज आहेत. आमच्यासारखे जिल्ह्यातील तमाम निष्ठावंत शिवसैनिक त्याचे बुरुज असून कितीही प्रयत्न करा, हा बुरुज ढासळणार नाही, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर अनेक आमदारांनी खोक्यांना बळी पडत मिंधे गटाची साथ दिली. काहीजण तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडले आणि मिंधे गटात गेले. मात्र आ. वैभव नाईक हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी आणि भगव्याशी प्रामाणिक राहिले. त्यामुळे त्यांना त्रास देण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. एसीबी कडून त्यांच्या मालामत्तेची तपासणी केली जात आहे. मात्र आ. नाईक हे राजकारणात येण्यापूर्वी पासून व्यावसायिक कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबाचे अनेक व्यवसाय आहेत. त्याबाबत सर्व कागदपत्रे त्यांच्या कडे आहेत. ते शिवसेनेचा बुरुज आहेत. आम्ही जिल्ह्यातील शिवसैनिक त्याची तटबंदी आहोत. कितीही चौकशी करा पण हा बुरुज ढासळणार नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षाप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा हा बुरुज निष्ठावंत म्हणून काम करत राहील. जोपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक तटबंदी म्हणून उभे आहेत, तोपर्यंत जिल्ह्यातील शिवसैनिक हा बुरुज ढासळू देणार नाहीत, असे सांगून ज्याप्रमाणे आमदार वैभव नाईक यांची चौकशी होते, तशी एसीबी कडून जिल्ह्यातील इतर आमदारांच्या संपत्तीची चौकशी करणार का ? असा सवाल हरी खोबरेकर यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!