शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरणाचे काम १५ जानेवारी पासून सुरु होणार
आ. वैभव नाईक यांची सा. बां. च्या अधिकाऱ्यांशी चर्चा ; हरी खोबरेकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरणाच्या बंद असलेल्या कामाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनद्वारे केलेल्या चर्चेनुसार मंदिर नूतनीकरणाचे काम येत्या १५ जानेवारी पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याआधी अनेकांनी शिवराजेश्वर मंदिराची दुरुस्ती करणार अशा घोषणा केल्या होत्या. काहींनी स्वखर्चातून मंदिर दुरुस्तीची ग्वाही दिली. मात्र आमदार वैभव नाईक यांनी दिलेले वचन पूर्ण करून मंदिर दुरुस्तीसाठी १ कोटी ५२ लाखाचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक व प्राचीन शिवराजेश्वर मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या मंदिराची डागडुजी, बांधकाम व नूतनीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे सातत्याने केली होती. राज्य सरकारची मंजूरी, केंद्रीय पुरातत्व खात्याची परवानगी अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत मंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटी ५२ लाखाचा निधी मंजूर करून आणला. त्याअंतर्गत मंदिराच्या खांबांची व इतर ६० लाख रु.ची कामे पूर्ण झाली आहेत.त्यापैकी ३० लाखाचे बिल अदा करण्यात आले आहे. कुशल कारागिरांकडून हे काम करून घेतले जात असून सदर काम करणारे कारागीर हे सध्या परगावी असल्याने काम बंद ठेवण्यात आले असून येत्या १५ जानेवारी २०२३ पासून पुन्हा काम सुरु करण्यात येणार आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांना सांगितले आहे.