वायरी भूतनाथ मध्ये ठाकरे गटाची अवस्था “ना घरका ना घाटका” !
भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांची टीका ; प्रवीण लुडबे यांचा घेतला खरपूस समाचार
मालवण | कुणाल मांजरेकर
वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण बहुमत असताना सुद्धा उबाठा शिवसेनेचा उपसरपंच बसला नाही, याचे तीव्र दु:ख ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांचे खासगी स्वीय सहाय्यक असलेल्या भाई मांजरेकर यांच्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्याचे काम उबाठाचे विभागप्रमुख प्रवीण लुडबे यांनी केले आहे. काँग्रेसने आणलेल्या प्रस्तावानंतर भाजपने सहमती दर्शवत वायरी गावच्या विकासासाठी उपसरपंच निवडणुकीत स्थानिक पातळीवर काँग्रेस सोबत युती करून शिवसेनेच्या उपसरपंच उमेदवाराचा पराभव केला. या अंतर्गत घडामोडीत उपसरपंच नक्की कोण झाले, हे प्रवीण लुडबे यांना समजले देखील नाही. त्यांनी आणलेल्या पेढ्यावर माशी शिंकली. उपसरपंच निवडणुकीत भाजपावर नामुष्की ओढवली नाही, तर भाजपच्या सक्रिय राजकारणामुळे ठाकरे शिवसेनेची अवस्था “ना घरका ना घाटका” झाली आहे, अशी टीका भाजयुमोचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी केली आहे. प्रवीण लुडबे यांचा त्यांनी खरपूस समाचार यावेळी घेतला.
वायरी भूतनाथ गावात उपसरपंच निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा पराभव होऊन भाजपच्या मदतीने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. यावेळी भाजप ने जल्लोष साजरा केला. तर भाई मांजरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर टीका केली होती. या टिकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रवीण लुडबे यांनी वायरीत भाजपची अवस्था म्हणजे “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना” असल्याची टीका करत भाई मांजरेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. याला आता भाजयुमोचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण बहुमत असताना आपल्या उमेदवाराचा पराभव होतो, याचे तीव्र दुःख प्रवीण लुडबे आणि टीमला झाले आहे. जेवण असून जेवता आलं नाही, अशी त्यांची वायरी भूतनाथ गावात गत झाली आहे. त्यामुळे स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आणी आमदार वैभव नाईक यांना खुश करण्यासाठी भाजपा आणि भाई मांजरेकर यांच्यावर टीका केली जात आहे. वायरी मध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी आणि महेश लुडबे यांनी भाजप कडे काँग्रेस उमेदवार सौ. माणगावकर यांच्या साठी मदत मागितली. आणि या मदतीच्या जोरावर प्राची माणगावकर यांनी उपसरपंच निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा पराभव केला. त्यामुळे वायरी भूतनाथ गावात उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला हे प्रवीण लुडबे यांचे म्हणणे त्यांच्या बुध्दीची किव आणणारे आहे. जर प्राची माणगावकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या, तर पराभूत उमेदवार चंदना प्रभू कोणाच्या उमेदवार होत्या. की त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक रिंगणात उतरवले होते ? असा सवाल मंदार लुडबे यांनी केला आहे.
चौके गावातील विजयाचे श्रेय शिवसेना ठाकरे गटाने घेऊ नये. चौके मध्ये गोपाळ मामा हे सामान्य नेतृत्व म्हणून गावाने स्वीकारले. येथे भाजपा विरोधी लाट नव्हती. तर तारकर्ली गावात मावळत्या सरपंच सौ. केरकर यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे भाजपने निवडणुकी पूर्वी जाहीर करीत सौ. शीतल मयेकर यांना पाठींबा दिला होता, याची आठवण मंदार लुडबे यांनी करून देत हे जर प्रवीण लुडबे यांना समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीची किव वाटते, असे म्हटले आहे.
जि. प. सदस्यांना नाही जमले ते भाई मांजरेकर यांनी करून दाखवले
राणे साहेबांचे खासगी सचिव भाई मांजरेकर यांचे गावच्या विकास कामातील योगदान पाहून प्रवीण लुडबे यांची झोप उडाली आहे. हरी खोबरेकर जि. प. सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य असतानाही गावातील ग्रा. पं. च्या नूतन इमारतीसाठी ते साधे शिफारसपत्र देऊ शकले नाहीत. ते काम भाई मांजरेकर यांनी राणे साहेबांच्या माध्यमातून करत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. मागील दहा वर्षे हरी खोबरेकर हा प्रस्ताव सादर करू शकले नाहीत. उद्योजक बनून विकास करता येत नाही, काम करण्यासाठी भाई मांजरेकर यांच्यासारखी धडाडी लागते. प्रवीण लुडबे यांनी मोदक खाणे बंद करून उद्धव ठाकरे यांचे प्रामाणिक काम करावे, असा सल्ला मंदार लुडबे यांनी दिला आहे.